बारावे व गौरीपाड्यातील नागरिकांची भेट

कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी कल्याणमधील वकिलांबरोबर शनिवारी संवाद साधला. तसेच बारावे व गौरीपाड्यातील स्थानिक महिलांसह नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात कल्याणबरोबरच देशभरात केलेल्या निवडक कार्याची माहिती देऊन, विकसित भारत घडविण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे आवाहन केले.

कल्याण शहरातील बारावे व गौरीपाडा परिसराचा कपिल पाटील यांनी काल दौरा केला. तत्पूर्वी कल्याणमधील अॅडव्होकेट्स वेल्फेअर फोरमच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वकिलांबरोबर संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेल्या विकासकार्याबरोबरच कायदा क्षेत्राविषयी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच सलग तिसऱ्यांदा मोदींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या वेळी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, शहराध्यक्ष वरुण पाटील, कल्याण बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रकाश जगताप, सतीश अत्रे, शिल्पा राम, अर्चना सबनीस, भाजपाच्या पदाधिकारी वैशाली पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

गौरीपाडा येथील जय हनुमान मंदिरात कपिल पाटील यांनी दर्शन घेतले. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून स्मार्ट सिटी योजनेतून राबविलेल्या सिटी पार्क व पार्किंग प्लाझासह विविध कामांची माहिती दिली. या वेळी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे, भगवान म्हात्रे, रघुनाथ म्हात्रे, लक्ष्मण म्हात्रे आदींची उपस्थिती होती. गौरीपाड्यापाठोपाठ बारावे येथील भगवान शिवमंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर या भागातील स्थानिक नागरिकांबरोबर संवाद साधला.

चौकट

कपिल पाटील यांच्याकडून चणे-शेंगदाण्याचा आस्वाद

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमच्या दौऱ्यावर आलेल्या महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी शनिवारी सायंकाळी बाजारपेठेत फिरताना गरमागरम चणे-शेंगदाण्याचा आस्वाद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *