उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी

नवी दिल्लीदिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भ्रष्ट्राचाराच्या आरोपामुळे ईडी आणि सीबीआयची चौकशी सुरु असतानाच आता त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप करण्यात आले आहेत. आणि हे आरोप स्वता दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केले आहेत. केजरीवालांवर ‘शिख फॉर जस्टिस’ या दहशतवादी संघटनेकडून १६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी घेतल्याचा आरोप करत NIA चौकशीची शिफारस केली आहे.

व्हीके सक्सेना यांना विश्व हिंदू महासंघाकडून लेखी तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने दहशतवादी देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेसाठी आणि खलिस्तान समर्थक भावनांना प्रोत्साहन देण्यासाठी खलिस्तानी गटांकडून १६ दशलक्ष डॉलर्स घेतल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर व्हीके सक्सेना यांनी NIA तपासाची शिफारस केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.

तक्रारीत शिख फॉर जस्टिसचा प्रमुख आणि प्रतिबंधित खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने जारी केलेल्या व्हिडिओचा संदर्भ दिला आहे, ज्यामध्ये त्याने आरोप केला की, आपला ला २०१४ ते २०२२ दरम्यान खलिस्तानी गटांकडून १६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळाले आहेत. २०१४ मध्ये केजरीवाल यांनी गुरुद्वारा रिचमंड हिल्स, न्यूयॉर्क येथे खलिस्तानी नेत्यांशी बंद दाराआड चर्चा केल्या, ज्यामध्ये केजरीवालांनी खलिस्तानी गटांकडून आपला भरीव आर्थिक मदत देण्याच्या बदल्यात भुल्लरच्या सुटकेचे आश्वासन दिले होते.

एनआयए तपासाच्या शिफारशीवर आम आदमी पक्षाने हा कट असल्याचे म्हटले आहे. उपराज्यपाल भाजपचे एजंट असल्याचा आरोप दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला. सीएम केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक मोठे षडयंत्र रचले जात आहे. दिल्लीतील सातही जागा भाजपने गमावल्या आहेत. पराभवाच्या भीतीने भाजप घाबरलाय. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने हा कट रचला होता, अशी टीका आपने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *