स्टंप व्हीजन
स्वाती घोसाळकर
अखेर मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर अपेक्षित विजय मिळवता आला. सूर्याच्या घणाघाती शतकामुळे मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैराबादविरुद्ध ७ विकेट्सनी विजय मिळवला. तर दुसरीकडे हैदराबादला मात्र आता बाद फेरी गाठण्यासाठी अजून वाट बघावी लागणार आहे.
केकेआरविरुद्धचा सामना हरल्यानंतर मुंबई याधीच आयपीएलच्या शर्यतीत बाहेर फेकली गेली होती. पण उरलेल्या सामन्यात समाधानकारक विजय तरी संघाने मिळवावा अशी अपेक्षा वानखेडेवरील फॅन्स करत होते. अखेरीस कालची संध्याकाळ फॅन्ससाठी सेलिब्रेशनची ठरली. ‘एकच वादा, सूर्या दादा’, म्हणत सूर्यकुमार यादवने ३६० अंशात म्हणजेच वानखेडेच्या कानाकोपऱ्यात फटकेबाजी करत पैसा वसूल कामगिरी केली. आलेल्या प्रत्येक मुंबईकराला त्याने चौकार आणि षटकाराने सलामी दिली. सूर्याने ५१ चेंडूत नाबाद १०२ धावा ठोकल्या. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची सुरुवात चांiगली झाली नाही. ईशान किशन, रोहित आणि नमन लवकर बाद झाले. इंडियन्सची अवस्था होती ३ बाद ३१. पण त्यानंतर तिलक वर्माबरोबर सूर्याने आक्रमक बॅटिंग करत मुंबईला एक सहज विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने फटकेबाजीला सुरुवात केली. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा पहिला गोलंदाजीचा निर्णय चुकीचा तर नाही ना? असा प्रश्न फॅन्सच्या समोर येत होता. पण त्यानंतर बूमराहने अभिषेक शर्माची विकेट घेत मुंबई इंडियन्सला पहिला सुखद धक्का दिला. यानंतर टीममध्ये पहिल्यांदा संधी मिळालेल्या अंशूल कंबोजने पहिली विकेट मिळवायला जास्त वेळ लावला नाही. त्याने मयांक अग्रवालच्या रूपात आपली पहिली विकेट घेतली. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना टिकू दिलं नाही. कर्णधार हार्दिक पंड्या आणि पीयूष चावलाने मुंबई इंडियन्ससाठी ३-३ विकेट्स घेतल्या.
