अनिल ठाणेकर

ठाणे : ठाणे लोकसभेतील महायुती पुरस्कृत शिवसेना शिंदेगटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी नाराज भाजप नेते गणेश नाईक यांची मंगळवारी तातडीने सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार व नवीमुंबई भाजपचे अध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक उपस्थित होते.

माजी खासदार संजीव नाईक हे ठाणे लोकसभेतुन निवडणूक लढविण्यास उत्सुक होते. तिकीट मिळेल हे गृहीत धरुन संजीव नाईक यांनी ठाणे लोकसभेतुन निवडणूक प्रचारही सुरु केला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेसाठीआग्रही होते. तर संजीव नाईक यांच्यासाठी भाजप अत्यंत आग्रही होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप व शिवसेना शिंदेगटात ठाणे लोकसभा जागावाटपावरुन दोन्हीकडे रस्सीखेच सुरु होती. अखेर पालघर लोकसभेची जागा शिवसेना शिंदेगटाकडून घेऊन ठाणे लोकसभेची जागा शिवसेना शिंदेगटाला भाजपने सोडली पण यामुळे ठाणे लोकसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्ते अतिशय नाराज झाले होते. नवीमुंबई व मिराभाईंदर येथील नाईक समर्थक ४०० भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी या नाराजीतुन पक्षाकडे राजीनामे सोपविले होते. तर भाजप नेते गणेश नाईक यांनीही, प्रेमाने दिलेला पक्ष आदेश स्वीकारू पण आपल्याला तंबी देणारा जन्माला आलेला नाही, असे ठणकावून आपली नाराजी उघड केली होती. ठाण्यात सोमवारी झालेला टीपटाॅप प्लाझा येथील ठाणे लोकसभेतील पदाधिकारी मेळाव्यातही गणेश नाईक, संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह नवीमुंबई व मिराभाईंदर येथील नाईक समर्थकांनी गैरहजर राहून आपली नाराजी उघड केली होती.

यामुळेच नरेश म्हस्के यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी व नाराजी दूर करण्याकरिता तातडीने राज्याचे माजी मंत्री व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत निवडणुकीच्या अनुषंगाने नरेश म्हस्के आणि गणेश नाईक यांच्यात चर्चा झाली. प्रचारसभा, चौकसभा, जाहीरसभेबरोबरच घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचे निर्णय पोहोचविले पाहिजेत, अबकी बार ४०० पार खासदार निवडून यायलाच हवेत, अशी गणेश नाईक यांच्यासोबत चर्चा झाल्याचे व निवडणुकीतील विजयासाठी गणेश नाईक यांनी आपल्याला आशीर्वाद दिल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *