नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील विद्यमान इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण करुन सदर इमारत धोकादायक असल्यास पावसाळयापूर्वी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 264 अन्वये प्रवर्गनिहाय धोकादायक म्हणून घोषित करण्यात येतात. सी-1 प्रवर्गातील इमारती या मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिकाम्या करणेबाबत त्या त्या सहकारी गृहनिर्माण संस्थाना नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात येते.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 265(अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरु होऊन 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट संबंधित गृहनिर्माण संस्थेने एक वर्षाच्या मुदतीच्या आत नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडून करुन घेणे अनिवार्य आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्था अधिनियम 1968 अन्वये शासनाने जारी केलेल्या मॉडेल बाय-लॉ मधील मुद्दा क्र.75 (अ)(i) नुसार इमारतीचे आयुर्मान 15 ते 30 वर्षांचे दरम्यान असल्यास किमान 5 वर्षातून एकदा तसेच 75 (अ)(ii) नुसार इमारतीचे आयुर्मान 30 वर्षापेक्षा जास्त असल्यास किमान 3 वर्षातून एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेणे अनिवार्य आहे. सदर स्ट्रक्चरल ऑडिट हे महानगरपालिकांमध्ये नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडूनच करुन घेणे बाबतची तरतूद आहे. त्यास अनुसरून संबंधित सोसायटीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. याबाबतची दक्षता ही सोसायटीचे अध्यक्ष / सचिव यांनी घेणे आवश्यक आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नजिकच्या काळात विदयमान इमारतींमधील सदनिकांमध्ये अंतर्गत फेरबदलाची कामे – ज्यामध्ये लाद्या (Flooring) बदलणे, अंतर्गत असलेले आरसीसी कॉलम / बीम यांची दुरुस्ती करताना सदर सदनिकेच्या फ्लोअरिंगचा स्लॅब खालच्या मजल्यावर कोसळण्याच्या घटना यापूर्वी नेरुळ, सेक्टर 17 येथील जिमी टॉवर सहकारी गृहनिर्माण संस्था, सेक्टर 06 येथील तुलसी भवन, तसेच सन 2016 मध्ये अशाच प्रकारच्या अपघाताने जिवित हानी झालेली असल्याच्या घटना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये घडलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, नवी मुंबई महानगरपालिकेस लागू असलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील तरतुदी विचारात घेता – इमारतींच्या रहिवास तथा वाणिज्य वापराच्या इमारतींमधील वरच्या मजल्यावरील गाळयांमध्ये अंतर्गत वा बाह्य भागात दुरुस्ती / स्ट्रेंग्थनींग करणेसाठी परवानगी प्राप्त करण्याची आवश्यकता असल्यास नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचे प्रमाणपत्रासह नियमानुसार वास्तुविशारदामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी प्राप्त करुन घेऊन त्यांचे देखरेखीखाली अशी कामे करणे आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे ज्या बाबींकरीता नियमावलीतील तरतुदीनुसार अंतर्गत फेरबदलाचे काम करताना परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. अशा बाबतीत सदर काम करताना नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचे देखरेखीखालीच करण्यात यावे. तसेच सदर काम करतेवेळी संबंधित सदनिका / वाणिज्य वापराच्या गाळेधारकांनी संबंधित सोसायटीस अवगत करणे आवश्यक असून संबंधित सोसायटीने सदर काम हे नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचे देखरेखीखाली होत असल्याची खात्री करावी.
भविष्यात विद्यमान इमारतींमध्ये दुरुस्तीच्या कामांमुळे काही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित सदनिका / वाणिज्य वापराचे गाळेधारक यांना व सोसायटीचे अध्यक्ष / सचिव यांनादेखील जबाबदार धरण्यात येईल. जेणेकरून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात यापूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. याची कृपया नोंद घेणेबाबत याव्दारे नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर आवाहन करण्यात येत आहे.