राजन विचारे यांचे मिंधेना रोखठोक प्रतिउत्तर

ठाणे : प्रतिनिधी – धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच होता त्यातले प्रसंग तुम्हीच दाखवले मग हे प्रसंग खोटे कसे असा सवाल उपस्थित करीत महाविकास आघाडीचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्याच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २ वर्षानंतर त्यांना आपण खोटं दाखवले असल्याची कबुली देतात याचा अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखविला असल्याचा आरोप विचारे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०१३ मध्ये ते पाच आमदारांना घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेवटच्या बंडा पर्यंत मी त्यांच्या सोबत होतो. मात्र त्यांना केवळ शिवसेना संपावयाचीच होती असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यावर केला आहे.  आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते, असे देखील शिंदे म्हणाले होते, मात्र मागील दोन निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचेच काम शिंदे यांनी केले. ठाण्यातील सर्व यंत्रणा मिंधे तिकडे घेऊन जात असत त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कामावर निवडून आलो आहे. शिंदे यांनी केलेले बंड फोडलेली शिवसेना हे सर्व केवळ खुर्चीसाठीच होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
यांनी केवळ सेटिंगचे राजकारण केले
शिंदे यांनी पहिले आमदराकीचे तिकीट मीच मिळवून दिले. आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ठाण्यासाठी काय काय केले त्याची उत्तरे आधी द्या असा सवालही त्यांनी केला. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली, कॉंग्रेस, राष्ट्रवादी फोडली. केवळ सेटींगचेच राजकारण तुम्ही आतापर्यंत करीत आला आहेत. तसेच आता महाराष्ट्राची आणि ठाण्याची जनता तुमचा तमाशा बंद केल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास विचारे यांनी यावेळी व्यक्त केला.
गोल्डन गॅंगचा “लीडर” म्हणून म्हस्के प्रसिद्ध
नरेश म्हस्के कोरोना काळात कुठे होता, घरात बसून होता, महापौर पदाच्या कारर्कीद काय काम केले हे सांगावे, केवळ गोल्डन गँगचा लिडर म्हणूनच त्याची आतापर्यंत प्रसिद्धी राहिली आहे. ठाणे महापालिका लुटण्याचे काम मिंधे आणि म्हस्के याने केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली त्यामुळे तुमच्या मनात दिघे यांच्यावरील प्रेम काय आहे हे जनतेला माहित आहे.
शिवसेनेत मला ४० वर्ष झाली, यांचा उदय साहेब गेल्यानंतर झाला
आम्ही टेभी नाक्यावरील साहेबांचे कट्टर कार्यकर्ते होतो आणि अजूनही आहोत. मला शिवसेनेत ४० वर्ष झाली या बाकीच्यांचा उदय साहेब गेल्यानंतर झाला आहे. बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हते, दिघे साहेबानी मोठं वादळ येऊन सुद्धा पक्ष एकसंघ ठेवला. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचा विश्वास होता. याना मात्र शिवसेना संपवायची होती असा आरोप विचारे यांनी मुख्यमंत्र्यावर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *