देशातील अब्जाधीशांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या गौतम अदानी यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने शेअर्समध्ये फेरफार केल्याच्या आरोपानंतर गेल्या वर्षी समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. आता अदानी समूहाच्या सहा कंपन्यांना ‘सेबी’कडून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.
या नोटिशीत कंपन्यांना शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. ‘सेबी’च्या म्हणण्यानुसार, संबंधित पक्षाच्या व्यवहारांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपन्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. समूहाच्या केवळ दहा कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत. समूह कंपनी ‘अदानी एंटरप्रायझेस’च्या वतीने मार्च २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये ‘सेबी’कडून दोन नोटीस मिळाल्याचे सांगण्यात आले. कंपनीने शेअर बाजाराचे नियम आणि व्यवहाराच्या पद्धती पाळल्या नसल्याचा आरोप नोटीशीमध्ये करण्यात आला आहे. कंपनीने बाहेरील व्यक्तींशी केलेले व्यवहार आणि गेल्या वर्षीच्या लेखापरीक्षकांच्या प्रमाणपत्राबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘सेबी’ने अदानी पोर्टस आणि ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’, ‘अदानी पॉवर’, ‘अदानी एनर्जी सोल्युशन्स’, ‘अदानी विल्मर’ आणि ‘अदानी टोटल गॅस’ यांनाही नोटीस बजावली आहे. शेअर बाजारात अदानी समूहाच्या दहा कंपन्या सूचीबद्ध आहेत. आता ट्रेंडिंग तपासामुळे कंपन्यांच्या आर्थिक अहवालांवर परिणाम होऊ शकतो. सेबीच्या नोटीसचा फारसा परिणाम होणार नाही असे काही तज्ज्ञांना वाटते, तर काही लेखापरीक्षकांच्या म्हणण्यानुसार ‘अदानी विल्मर’ आणि ‘अदानी टोटल गॅस’ वगळता इतर काही कंपन्यांबाबत चिंता आहेत. ‘सेबी’च्या तपासामुळे कंपनीच्या आर्थिक अहवालावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. ‘अदानी एंटरप्रायझेस’च्या लेखापरीक्षकांचे म्हणणे आहे की ‘सेबी’ची चौकशी सुरू असून अद्याप निकाल आलेला नाही. आम्ही या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवू आणि कोणतीही नवी माहिती प्राप्त झाली किंवा परिस्थितीत काही बदल झाला तर त्याआधारे आमच्या मताचे पुनर्मूल्यांकन करू.
‘अदानी पॉवर’ने वर्ष संपल्यानंतर ‘सेबी’च्या दोन्ही नोटिशींना उत्तर दिले आहे. ‘सेबी’ने आरोप केला आहे की कंपनीने आपल्या आर्थिक अहवालात काही व्यवहार दाखवले नाहीत आणि त्या व्यवहारांसाठी आवश्यक मान्यताही घेण्यात आल्या नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *