लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी दिल्या शुभेच्छा!
डोंबिवली : उल्हासनगरमधील लेवा पाटीदार एकता संघाने कल्याण लोकसभेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. लेवा पाटीदार एकता संघाच्या सदस्यांनी आज डोंबिवली येथे डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत हा जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी खासदार शिंदे यांनी त्यांचे आभार मानत आगामी काळात समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले.
कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मागील १० वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण लोकसभा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख निर्माण झाली असून त्यामुळेच विविध संस्था, संघटना यांच्याकडून सातत्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला जात आहे.
आता उल्हासनगरमध्ये मोठ्या संख्येने वास्तव्याला असलेल्या लेवा पाटीदार समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघानेही खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी शिवसेनेचे उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचे सदस्य उपस्थित होते.