मुंबई : लाव रे तो व्हिडीयोने २०१९ची निवडणूक मोदीविरुध्द प्रचाराने ढवळून काढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एकाच व्यासपीठावर महायुतीच्या उमेदावारांच्या प्रचाराची सभा घेणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित राहणार
मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या सभेत जनतेला संबोधित करणार आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीची मुंबईत सांगता सभा होणार आहे. यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत, त्यांचा मुंबईत रोड शो देखील होईल.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी 17 मे रोजी मुंबईत भव्य सभा पार पडणार आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रचाराच्या दृष्टिकोनातून ही सभा खूप खास असणार आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. महायुतीच्या सर्व लोकसभा उमेदवारांच्या समर्थनार्थ मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिंगणात उतरले आहेत.
तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राज ठाकरे यांनी कणकवलीत भाजप उमेदवार नारायण राणे यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित केलं होतं. आता १० मे रोजी पुण्यात आणि १२ मे रोजी ठाणे जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.