ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे शहरात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून मंगळवारी तलावपाळी परिसरातील बसस्थानकांवरील प्रवाशांमध्ये मतदार जनजागृती करण्यात आली. ‘मतदान जनजागृती’ विषयक माझं मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या घोषणा सर्व प्रवाशांनी मोठ्या आवाजात सामूहिकपणे दिल्या.
२५ ठाणे- लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ प्रयत्नशील आहे. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप’ अंतर्गत सदर मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.
मी मतदान करणारंच…. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा. या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले. तसेच बसस्थानकात स्वीप पथकाने सर्व प्रवासी नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून देत मतदानाची शपथ दिली. ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देखील यावेळी देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन तलावपाळी बसस्थानकातील सर्व प्रवासी नागरिकांना करण्यात आले.
