अनिल ठाणेकर
ठाणे : नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया (नुसी) व नुसी अकॅडमीतर्फे. मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी तसेच या क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मर्चंट नेव्हीमध्ये शिबिरातील प्रशिक्षणानंतर मुलींना नोकरीची हमी दिली जाते अशी माहिती नुसीचे सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी दिली आहे.
नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया व नुसी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून मुलींसाठी मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसाठी मार्गदर्शन शिबिर ९ मार्च २०२४ रोजी साठे संकुल चिपळूण येथे पार पडले. आता १२ वीची परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. तर १० वीची परीक्षा सुरू झाली आहे. विद्यार्थी व पालकांना इयत्ता १० वी १२ वी नंतर नेमके कोणकोणत्या क्षेत्रात करियर विद्यार्थ्याने करावे, त्यातील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे मर्चंट नेव्ही, या क्षेत्रात करिअर करायला उत्तम संधी आहे. परंतु या क्षेत्राविषयी तेवढी जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये नसते. त्यामुळे मर्चंट नेव्ही विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मर्चंट नेव्ही क्षेत्राबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया व युनियनचे सहसचिव सलीम झगडे उपस्थित होते. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना करिअर नेमके कोणत्या क्षेत्रात करता आले पाहिजे, त्या क्षेत्राची माहिती असणे गरजेचे आहे. त्यापैकी मर्चंट नेव्ही एक अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे व त्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती नसते, त्यामुळे फार ठराविक विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतात. या क्षेत्राविषयी माहिती व्हावी आणि त्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी निर्माण व्हावी, यासाठी नॅशनल युनियन ऑफ युनियन व नुसी मरीन अकॅडमी यांनी कोकणातील १० मुलींनी या क्षेत्राकडे वळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. नुसीने घेतलेला हा पुढाकार मुलींसाठी नक्कीच कौतुकास्पद आहे. या मार्गदर्शन शिबिरातून अनेक विद्यार्थी आपले करिअर घडवतील, असा अशावाद त्यांनी व्यक्त केला. या शिबिरात मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करण्यासाठी आव्हाने आणि संधी तसेच जीपीरेटींग व सीसीएमसी या कोर्सची विस्तृत माहिती देण्यात आली. व्यापारी नौदलातील जहाजांचे प्रकार, मालवाहून नेण्याची पद्धत आणि कार्यप्रणाली याबाबत माहिती दिली. नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या युनियनला १२७ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे महिला दिनाचे औचित्य साधून मुलींसाठी अल्प फी मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलींसाठी विशेष बॅच घेण्यात आली असल्याने नुसी मरीन अकॅडमी गोवा येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या ॲकॅडमीतून कोर्स करून बाहेर पडलेल्या मुलींना भारतातील नामांकित कंपनी अँग्लो ईस्टर्न कंपनीत नोकरीची संधी देखील मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त मुलींनी या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन नुसीचे सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाला नुसीचे एक्झिक्युटीव्ह मेंबर अजिम फणसोपकर, समीर करबेलकर, फरजाना सावंत, मुबारक जुवळे व माजी एक्झिक्युटीव्ह मेंबर इरफान चिपळूणकर, जलील नांदगावकर, जौहर सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रमजान कडवईकर यांनी केले.