उल्हासनगर : महायुती मधील सर्व धर्मीयांसोबत उल्हासनगरातील तमाम सिंधी नेते आणि राजकीय वैरी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना पुन्हा तिसऱ्यांदा जिंकून देण्यासाठी एकवटले असून डॉ.शिंदे यांच्या विकास रथाचे माजी आमदार पप्पू कलानी,आमदार कुमार आयलानी सारथी बनल्याचे चित्र उल्हासनगरातील रॅलीत बघावयास मिळाले आहे.
या सुखावून टाकणाऱ्या चित्रांमुळे संपूर्ण शहरातून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांना रेकॉर्डब्रेक मते मिळणार आणि ते विजयाची हॅटट्रिक मारणार असा विश्वास कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी 8 तारखेला सायंकाळ पासून शहरातून दोन टप्यात डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या रॅली काढण्यात आल्या.पहिला टप्पा हा अंबरनाथ विधानसभा व कल्याण पूर्व विधानसभेतील कॅम्प नंबर 5 नेताजी चौक ते कॅम्प नंबर 4 ओटी सेक्शन.
या रॅलीत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सोबत जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,आमदार डॉ.बालाजी किणीकर,आमदार कुमार आयलानी,शिवसेनेचे चंद्रकांत बोडारे,अरुण आशान,राजेंद्र चौधरी,रमेश चव्हाण,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी,टीम ओमी कलानीचे कमलेश निकम,मनोज लासी,पीआरपीचे प्रमोद टाले,महिला आघाडी यांनी मोठया संख्येने भाग घेतला.
पप्पू कलानी-कुमार आयलानी एकत्र
रात्रीचा उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील दुसरा टप्पा हा लक्षवेधक ठरला.या रॅलीत डॉ.श्रीकांत शिंदेंसोबत सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे प्रणेते,चारदा आमदार म्हणून निवडून आलेले व जन्मठेपेच्या शिक्षेतून बाहेर आलेले माजी आमदार पप्पू कलानी,विद्यमान आमदार कुमार आयलानी,आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव,भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री,मनसेचे शहराध्यक्ष संजय घुगे आदी सहभागी झाले होते.
राजकीय वैरी एकवटले
विशेष म्हणजे युथ आयकॉन ओमी कलानी यांच्या टीम ओमी कलानी सोबत कुमार आयलानी,प्रदीप रामचंदानी,भगवान भालेराव,भारत गंगोत्री यांचे राजकीय गणित जुळत नसून त्यांचे राजकीय वैर हे अनेकदा मासमीडियावर उघड होते.असे असले तरी डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सोबत पप्पू कलानी,कुमार आयलानी,भगवान भालेराव,प्रदीप रामचंदानी,भारत गंगोत्री हे एकाच रथावर एकवटल्याने डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रथी महारथिंची मोट बांधली असा सकारात्मक सूर उमटू लागला आहे.
डॉ.श्रीकांत शिंदे-ओमी कलानी यांचे दोस्ती का गठबंधन
ओमी कलानी यांची पत्नी पंचम ओमी कलानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आहेत.मात्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी मैत्रीचे नाते असल्याने ओमी कलानी यांनी डॉ.शिंदे यांच्यासोबतचे दोस्ती का गठबंधन जाहीर केलेले आहे.त्यासाठी त्यांनी 5 हजार स्टिकर्स तयार केले असून त्याचे अनावरण डॉ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत.याशिवाय डॉ.शिंदे यांच्या प्रचारासाठी दोन प्रचार रथ सज्ज केलेले आहेत.
