तेलंगणा : भाजपा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि अनूसुचित जाती, अनूसुचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचं (ओबीसी) आरक्षण वाढवू असे जाहीर आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तेलंगणाच्या भोनगीर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारासाठी आयोजित प्रचारसभेत शाह यांनी हे आश्वासन दिले.
अमित शाह म्हणाले, काँग्रेस खोटं बोलून, अफवा पसरवून निवडणुका लढू आणि जिंकू पाहत आहे. ते लोक म्हणतात की भाजपा पुन्हा सत्तेवर आली, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ते आरक्षण संपवून टाकतील. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या १० वर्षांपासून या देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी कधी तसा विचारही केला नाही. १० वर्षांत आम्ही आरक्षणाला गालबोटही लावलं नाही. काँग्रेस पक्षाने मात्र मुसलमानांना चार टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षण कमी केले काँग्रेसने एक प्रकारे मागासवर्गीयांच्या आरक्षणावर दरोडा टाकला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणाच्या जनतेने आम्हाला लोकसभेच्या चार जागा दिल्या होत्या. यावेळी आम्ही तेलंगणात १० पेक्षा जास्त जागा जिंकू. तेलंगणात आम्ही यंदा दुहेरी आकडा गाठणार आहोत. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी ४०० पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा पंतप्रधान होणार आहेत, असे शाह म्हणाले,
शाह म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक ही राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. यात तुम्हाला (जनतेला) दोन गोष्टींपैकी एकाची निवड करायची आहे. ‘विकासासाठी मत’ की ‘जिहादसाठी मत’ या दोन्हीपैकी एकाची निवड करून तुम्हाला देशात सरकार बनवायचं आहे. नरेंद्र मोदीनी दिलेली विकासाची गॅरंटी ही भारतीय गॅरंटी आहे आणि राहुल गांधींची गॅरंटी ही चिनी गॅरंटी आहे. राज्यात काँग्रेस, भारत राष्ट्र समिती, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन या तीन पक्षांचं ‘तुष्टीकरण त्रिकुट’ आहे. हे लोक एका विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण करत आहेत. तसेच राम नवमीच्या दिवशी मिरवणुका काढू देत नाहीत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करतात. त्यामुळे यांचा निषेध करायला हवा.