मुंबई : उद्धव ठाकरे यांचा तोल सुटलेला आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. त्यांनी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवावे. त्यांची मदत घ्यावी, असा पलटवार प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो, त्यावेळी निश्चितपणे त्यांच्या लक्षात येते आहे की, जनतेने आपल्याला नाकारले आहे. म्हणूनच आता शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची पातळी खाली उतरलेली आहे. खरोखरच उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अजित पवारांनी शरद पवारांबरोबर पक्ष उभा केला. पण त्यांना बाहेर पडावे लागले. कारण त्यांना लक्षात आले की, आपल्याला पक्ष मिळणार नाही. आपल्याला पक्षात स्थान मिळणार नाही. सुप्रिया सुळेंनाच ते पक्षाची जबाबदारी मिळणार हे समजल्यामुळे ते बाहेर पडले. तसेच अजित पवार उद्धव ठाकरेंना किती ओळखतात हे मला माहिती नाही. पण मी उद्धव ठाकरेंना चांगला ओळखून आहे. सध्या उद्धव ठाकरेंचे फिलॉसॉफर आणि गाइड हे शरद पवार आहेत. शरद पवार जे म्हणतील, तेच उद्धव ठाकरे करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर, माझी भेट अनिल देशमुख यांनी घेतलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.