नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत आहेत. त्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचा दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत, असा दावा करीत युती धर्म न पाळणार्या छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी खळबळजनक मागणी शिंदे गटाचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केली आहे.
नांदगाव मतदार संघातून जास्त मते भारती पवार यांना मिळाले तर त्याचे श्रेय आम्हाला आणि शिवसेनेला जाणार आहे. हे श्रेय आम्हाला मिळू नये, यामुळे छगन भुजबळ तुतारीचा (राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार) प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी पक्ष जाणूनबजून तुतारी पक्ष चालवत आहेत,असा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. मंत्रीपदे महायुतीकडून घ्यायची अन् प्रचार आणि प्रसार मात्र विरोधकांचा करायचा. महायुतीचा धर्म पाळत नसाल तर मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देवून खुशाल ‘ तुतारी ‘ वाजवावी असे आव्हान सुहास कांदे यांनी केले. दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ( शिंदे गट ) मेळावा कांदे यांच्या निवासस्थानी पार पडला. यावेळी ते बोलत होते.