काहीतरी नवीन…
श्याम तारे
“कुछ मीठा हो जाए” हे शब्द पाहिले किंवा कानावर पडले तरी आपल्याला साखर हा गोड पदार्थ आठवत नाही. तर आठवते ते चॉकलेट…ज्यांना मधुमेह नाही अशा जगातल्या अक्षरशः प्रत्येक पुरुष, महिला आणि बालकाला सर्वात आवडणारा पदार्थ असेल तर तो चॉकलेट हा आहे. आणि याच चॉकलेट संदर्भातील एक बातमी आज जगात पोचवली जातेय ती अशी की चॉकलेटच्या झाडाला रोग झालाय आणि तो प्रचंड वेगाने पसरत असल्यामुळे चॉकलेटवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.
चॉकलेटचा आवश्यक घटक असतो तो म्हणजे कोको अथवा ‘ककाव’. याची लागवड केली जाते आणि जगभर आपले आवडते चॉकलेट पोचते. आता या चॉकलेटच्या झाडाला ‘फांदीला सूज आणणाऱ्या विषाणूचा (व्हायरस) संसर्ग झाला आहे आणि त्यातून एकूण लागवडीपैकी १५ ते ५० टक्के लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे. हा विषाणू ‘मीलीबग्ज’ नावाच्या छोट्या आकाराच्या कीटकाच्या माध्यमातून पसरतो आणि तो या झाडाची पाने, कळ्या आणि फुले यांचा फडशा पाडतो. विषाणूचा हा आघात सर्वाधिक प्रमाणात पश्चिम आफ्रिकेत झाला आहे आणि हाच भाग जागतिक चॉकलेट उत्पादनाच केंद्र आहे. एकट्या घाना या देशात गेल्या काही वर्षात २५ कोटीहून अधिक ‘ककाव’ अथवा चॉकलेटची झाडे नष्ट झाली आहेत.
“या विषाणूमुळे जागतिक चॉकलेट पुरवठ्याला मोठा धोका पोचला आहे” असे मत या अभ्यासाचे प्रमुख अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाचे प्राध्यापक बेनिटो चेन चार्पेन्टियर यांनी ‘पीएलओएस वन’ नियतकालिकातील आपल्या शोध प्रबंधात म्हटले आहे. ते म्हणतात की या कीटकांवर कीटक नाशके काम करीत नाहीत. त्यामुळे शेतकरी लोकांना संसर्ग झालेली झाडे नष्ट करून नवीन कीटकरोधक जातीची लागवड करावी लागते आहे.
चॉकलेटविना जगाचा विचार करून बघा. चॉकलेटचे मूळ असलेला कोको हा भारतात चहाचे आगमन होण्याअगोदर मुलांना रोज सकाळी देण्याचे एक दर्जेदार पेय होते. थंडीच्या दिवसात गरमागरम कोको हे त्या काळातील मोठ्या माणसाचेही आवडते पेय असायचे. विषाणूचा हा संसर्ग कुठेही न थांबता पसरतोच आहे ही काळजीची बाब आहे.
चॉकलेटचे संरक्षण करण्यासाठी आशा नाही असे नाही. शेतकरी आपल्या लागवडीला आवश्यक ती लस टोचून काही प्रमाणात लागवड वाचवू शकतात. परंतु ही लस अतिशय खर्चिक आहे आणि ती लहान शेतकरी लोकांना परवडणारी नाही. त्यामुळे इकडे आड तर तिकडे विहीर अशी त्यांची परिस्थिती झाली आहे.
प्राध्यापक बेनिटो चेन चार्पेन्टियर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणखी काही विद्यापीठे आणि घानामधील कोको संशोधन संस्था यांच्या मदतीने एका नव्या गणिती पद्धतीने या विषाणूच्या पसरण्यावर उपाय शोधला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पादनातील तोटा देखील कमी होऊ शकणार आहे. यासाठी विषाणूचा प्रसार करणाऱ्या या कीटकांची हालचाल कशी असते हे तपासले गेले ज्यात हे सूक्ष्म कीटक मुंग्याच्या आधाराने जागोजागी जातात असे दिसले.
एखाद्या विषाणूचा पाडाव गणिती पद्धतीने केला जाऊ शकतो आणि हा विषय चॉकलेटइतका गोड असू शकतो या दोन्ही गोष्टी नवलाच्याच आहेत असे वाटते ना…
प्रसन्न फीचर्स