भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत रशियाचा वाटा पुन्हा वाढला आहे. ताज्या आकडेवारीवरून दिसून आले आहे की, एप्रिल महिन्यात भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी ४० टक्के वाटा एकट्या रशियाचा होता. त्याआधी मार्च महिन्यात एकूण आयातीमध्ये रशियातून येणार्या कच्च्या तेलाचा वाटा ३० टक्के होता.
गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात वाढली आहे. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली होती, अशा परिस्थितीत भारतीय रिफायनर्सनी पैसे वाचवण्यासाठी पुन्हा रशियाच्या कच्च्या तेलाची खरेदी वाढवली. त्यामुळे एप्रिल महिन्यात एकूण आयातीत रशियाचा वाटा पुन्हा वाढला. ‘व्होर्टेक्सा’ या एनर्जी कार्गो ट्रॅकरच्या मते भारतीय रिफायनर्सनी एप्रिलमध्ये रशियाकडून दररोज १.७८ दशलक्ष पिंप कच्चे तेल आयात केले. मार्च महिन्यात झालेल्या आयातीपेक्षा हे प्रमाण १९ टक्के अधिक आहे. गेल्या महिन्यात भारतीय रिफायनर्सदेखील रशियन कच्च्या तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार बनले. भारतीय रिफायनर्सच्या १.७८ दशलक्ष पिंप प्रति दिन खरेदीच्या तुलनेत चीनची आयात प्रति दिन १.२७ दशलक्ष पिंप इतकी होती. चीन दुसर्या क्रमांकावर होता. युरोपने एप्रिल महिन्यात रशियाकडून दररोज ३९६ हजार पिंप कच्चे तेल खरेदी केले. एप्रिल महिन्यात, रशियाने पुन्हा एकदा भारताच्या बाबतीत स्त्रोत देशांमध्ये पहिले स्थान मिळवले. एप्रिल महिन्यात भारताने रशियाकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची खरेदी केली. त्यानंतर इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे देश आले. आकडेवारीतील सर्वात मनोरंजक बाब म्हणजे भारताच्या चार सर्वात मोठ्या पुरवठादारांमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या रशियाने इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या एकूण पुरवठ्यापेक्षा जास्त पुरवठा केला.