ठाणे : मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांवर खालीलप्रमाणे विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी १७ मार्च रोजी मेगाब्लॉक घेणार आहे.
माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजे पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील. या गाड्या आपल्या नियोजित थांब्यावर थांबतील. ठाणे पुढे जाणाऱ्या जलद गाड्या पुन्हा मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या लाइनवर वळविण्यात येतील आणि पुन्हा माटुंगा येथील अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या नियोजित थांब्यावर थांबतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील. डाऊन जलद मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३९ वाजता सुटेल. अप जलद मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल. तसेच ब्लॉकनंतरची पहिली लोकल दुपारी ०४.४४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील. डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पनवेल लोकल सकाळी १०.१८ वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.४४ वाजता सुटेल.अप हार्बर मार्गावर पनवेल येथून शेवटची लोकल सकाळी १०.०५ वाजता सुटेल तर ब्लॉकनंतरची पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.४५ वाजता सुटणार आहे.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल/वाशी दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानका मार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.