अनिल ठाणेकर
ठाणे : बंदर परिसरात मोघरपाडा येथील ठाणे महापालिका हद्दीतील आरक्षित भूखंडावर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमाराची प्रतिकृती व त्यांची माहिती देण्यात येणार असून उद्याना’च्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ कोटी निधी मंजूर केला आहे. हे उद्यान नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरातील मोघरपाडा येथील आरक्षित भूखंडावर क्रिकेट मैदान व सरखेल कान्होजी आंग्रे उद्यान साकारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा सरनाईक यांच्या शुभहस्ते गुरुवारी पार पडला.
येथे १२ वर्षात अनेक नवीन उद्यानांचा विकास झाला आहे. वैविध्यपूर्ण पद्धतीने, बगीचा विकास आणि नागरिकांना, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना निवांत क्षण घालविण्यासाठी ही वेगवेगळी उद्याने विकसित करण्यात आली आहेत. शहराच्या विकास आराखड्यात बगीच्यासाठी जी आरक्षणे आहेत ती टप्प्या टप्प्याने विकसित केली जात आहेत व उर्वरित बगीचेही विकसित करावेत, शहराच्या सर्व भागात चांगल्या प्रकारची उद्याने असावीत तसेच राज्याला पराक्रमाचा ऐतिहासिक वारसा असल्याने त्याची माहिती आजच्या पिढीला व्हावी यासाठी ठाणे महापालिका हद्दीतील आरक्षित भूखंडावर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमाराची प्रतिकृती व त्यांची माहिती देण्यात येणार आहे. या उद्यानाच्या निर्मितीसाठी या उद्यानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. तेथील नागरिकांसाठी घोडबंदर रोडवरील मोघरपाडा येथील महापालिकेच्या १०,००० स्के. मीटरच्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर क्रिकेटचे मैदान व सरखेल कान्होजी आंग्रे या उद्यानात सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमार व वसई किल्याचे ऐतिहासिक महत्व साकारण्यात येणार असल्यामुळे इतिहासाच्या खुणा जिवंत राहून नवीन पिढीला प्रेरणा देईल असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक सिध्दार्थ ओवळेकर, नगरसेविका नम्रता घरत, साधना जोशी, विधानसभा समन्वयक साजन कासार, विधानसभा उपशहरप्रमुख कृष्णा भोईर, विभागप्रमुख दिलिप ओवळेकर, रवी घरत, विभाग समन्वयक राजेंद्र पाटील, महेश करकेरा, उपविभाग प्रमुख शिवाजी शिंदे, सुनील मोरे, शाखाप्रमुख प्रदीप पाटील, गिरीधर कांबळे, संजय राऊत, देवानंद भोईर, महिला विभाग संघटक रोहिणी ठाकूर, प्रियांका मसुरकर, महिला उपविभाग संघटक निर्मला कांबळे हे उपस्थित होते.
चौकट
कानोजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. सन १६९८ ते सन १७२९ या काळात ते आरमार प्रमुख म्हणून काम पाहत होते. त्यांनी ब्रिटीश, डच आणि पौर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना जेरीस आणले होते. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा बोटी बनविण्याचा कारखाना होता. त्यांचे सुरतेपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत समुद्रातील आरमारावर अनिर्बंध वर्चस्व होते. सन १७०२ – कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा, सन १७०६ – जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय., सन १७१० – ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (आताचे खांदेरी) कब्जा., सन १७१२ – मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज पकडले, ३०००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका., सन १७१३ – ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत., सन १७१७ – ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल ६०००० रुपयांची खंडणी वसूल केली., सन १७१८ – मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली., सन १७२० – ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल., सन १७२१ – अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा हल्ला असफल., सन १७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला. या त्यांनी केलेल्या महत्त्वाच्या कामगिऱ्या असून दि. ४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यांची समाधी अलिबाग येथे आहे. हा घडलेला इतिहास असून त्याचे ऐतिहासिक महत्त्व पुसले जाऊ नये व नवीन पिढीला त्याचे महत्व कळावे यासाठी महापालिकेच्या आरक्षित उद्यानाच्या भूखंडावर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराची प्रतिकृती व त्यांची माहिती देण्यात येणार आहे, असे आ.प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
चौकट
असे असेल ‘कान्होजी आंग्रे उद्यान’
ठाणे शहरात होणारे ‘कान्होजी आंग्रे’ हे अशा प्रकारचे उद्यान असेल तिथे रंगीबेरंगी फुले असतील. विविध प्रकारची फुले व फळझाडे यांचा सुरेख संग्रह असेल. जुन्या शैलीत, ऐतिहासिक शैलीचा ‘टच’ देऊन ते तयार करण्याचे नियोजन आहे. उद्यानाच्या कामात इतिहासाची जोड, विद्यार्थी-तरुणांना फुलझाडांची माहिती आणि सर्व वयोगटातील नागरिकांना हक्काचे निवांत क्षण घालविण्यासाठी जागा हा यामागील हेतू आहे.त्याचबरोबर या उद्यानात विविध रंगबेरंगी फुलांची झाडे, हिरवळ आणि त्या सर्व झाडांचा परियच येथे करून दिला जाईल. या उद्यानात आल्यानंतर नागरिकांना शुद्ध हवा घेता येईल तर या ठिकाणी सर्व स्तरामधील लोक मोठ्या प्रमाणावर येतील अशा पद्धतीने या उद्यानाची निर्मिती केली जाईल. हे नवे उद्यान साकारत असताना त्या जागेचा योजनाबद्ध पद्धतीने उपयोग करुन मोठी बाग तयार करण्यात येईल. कलात्मक व रचनात्मक उद्यान विकसित करण्याची माझी संकल्पना आहे. जी फुले पाहताच मन प्रसन्न होईल अशी फुलझाडे, हिरवळीचे विस्तीर्ण पट असतील. फुलझाडांची लागवड करताना उद्यानाच्या दुसऱ्या भागात केवळ सौंदर्यदृष्टी न ठेवता वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या उपयुक्त अशा झाडांची लागवड करून त्याची माहिती दिली जाईल. दुर्मिळ वृक्ष लावून त्याची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी त्याची माहिती त्या झाडांजवळ बोर्डवर लावली जाईल. नव्याने जे उद्यान विकसित करण्याचे नियोजन केले गेले आहे, ते शहरातील व शहराबाहेरून येणाऱ्या नागरिकांचे आकर्षणाचे केंद्र बनेल, असा विश्वास आमदार सरनाईक यांनी व्यक्त केला.