मुंबई : ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात माझ्यासहीत कुटुंबियांना अटक होण्याची भीती होती. ती टाळण्यासाठीच मनाविरुद्ध एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला अशी जाहीर कबुल देणाऱ्या रवींद्र वायकर यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती वकील असीम सरोद यांनी दिली आहे.
शिवाय, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे रवींद्र वायकर यांना अपात्र ठरवण्यासाठी वकील असीम सरोदे यांच्यामार्फत अर्ज करण्यात आला आहे. जोगेश्वरी येथील पंचतारांकित हॉटेलच्या इमारतीशी संबंधित मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये दाखल केलेल्या एफआयआरमुळे ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू होता. त्यामुळे रवींद्र वायकर आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक होण्याची भीती निर्माण झाली. याच भीतीपोटी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला, असा आरोप असीम सरोदे यांनी केला आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी गजानन किर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तिकर यांना मैदानात उतरवले आहे. तर एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.