ठाणे :निवडणूक कर्तव्यावर असलेले परंतु ज्यांचे मतदान कार्यक्षेत्राबाहेर असलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आज टपाली मतदानाची सुविधा 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सर्व 6 विधानसभा मतदारसंघ निहाय करण्यात आली होती. यावेळी 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला.

निवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर असलेल्या व सध्या नेमणूक असलेल्या क्षेत्राबाहेर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील तसेच निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी,कर्मचारी यांनी टपाली मतदान केले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उपस्थित होते. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे तर 143- डोंबिवली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांनी कल्याण येथील विष्णुदास भावे कलामंदिर येथे टपाली मतदान केले. तर 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी देखील टपाली मतदान केले.

त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच निवडणूक कर्तव्यावरील आणि 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ क्षेत्राबाहेर मतदार असलेल्या 564 अधिकारी/ कर्मचारी वर्गाने टपाली मतदानाद्वारे (postal ballate) आपल्या मतदानाचा हक्क काल बजावला.

अत्यावश्यक सेवेत असलेल्या, 24-कल्याण लोकसभा मतदार संघातील नोंदणीकृत मतदार-पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी, अग्निशमन दल, वैदयकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 /12 ड व EDC  कार्यप्रमाण पत्राकरीता नमुना 12 अ मध्ये अर्ज केला होता व जे कर्मचारी तपासणीअंती पात्र ठरले आहेत अशा 12 अ च्या पात्र कर्मचाऱ्यांना EDC  प्रमाणपत्र वितरण करणे,  तसेच नमुना 12 / नमुना 12 ड भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या मतदारांना टपाली मतपत्रिका वितरीत करुन, टपाली मतपत्रिकांच्या मतदानाकरीता निवडणूक निर्णय अधिकारी, 24- कल्याण लोकसभा मतदार संघ यांच्या स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदान केले. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ परिक्षेत्राबाहेरील निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा दि 17 मे व 18 मे 2024 रोजी देखील उपलब्ध राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *