मुंबई – इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येताच देशात जीएसटीच्या माध्यमातून होणारा कर दहशतवाद आम्ही थांबवू. जीएसटीमध्ये अशा घातक गोष्टी आहेत ज्यात काही चूक झाली तर सरळ जेलमध्ये टाकलं जाते. हा कर दहशतवाद आम्ही थांबवणारच असे आश्वासन उद्धव ठाकेर यांनी दिले.
देशाचं संविधान बदलण्यासाठी भाजपाला ४०० पार हवेत, लोकसभेत कायदा बनवला तर कोर्ट काय करणार, त्यामुळे आता जनतेनं अबकी बार तडीपार असा नारा दिला आहे. हुकुमशाहीला हरवावेच लागेल नाहीतर देशाचे भवितव्य अंधारात येईल. त्याकाळी परकियांची गुलामगिरी होती, आता स्वकीयांची येईल. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच अशी घोषणा टिळकांनी दिली होती. आता स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी टिकवणारच ही आजची घोषणा असली पाहिजे असा घणाघाती हल्लाही ठाकरे यांनी भाजपावर केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राची लूट थांबवली पाहिजे, राज्यातून बाहेर गेलेले उद्योग आपल्याला परत आणावेच लागतील. आर्थिक केंद्र परत आणायचं, मी मुख्यमंत्री असताना २ लाख कर्ज माफी दिली होती. शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन हमीभाव मिळाला पाहिजे. माझ्या काळात हमीभाव मिळत होता मग आता का नाही. शेतकऱ्यांना खते, बियाणे, अवजारे यासारख्या सगळ्या गोष्टीवरील जीएसटी मला काढायचा आहे. शेतकऱ्यांना गोदाम, शीतगृहे उपलब्ध करून द्यायला हवीत. मार्केट उपलब्ध करून द्यायला हवेत. प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत हॉस्पिटल राज्य आणि केंद्राच्या मदतीने करायची आहे. शेतकरी कर्जबाजारी आहे, युवकांना रोजगार द्यायचा आहे. महाराष्ट्राचं वैभव परत आणायचं आहे. महाराष्ट्र हे चित्र बदलू शकते आणि आम्ही ते बदलणारच असेही ठाकरे म्हणाले.
