अनिल ठाणेकर
ठाणे : कल्याण लोकसभेचे शिवसेना उमेदवार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांच्या संयुक्त प्रचारार्थ रविवारी कळवा येथील खारीगाव मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी थेट परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढला व परप्रांतीयांनाच लक्ष्य केले यामुळे डाॅ.श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या अडचणीत भर पडली आहे.
या देशातून, वेगवेगळ्या राज्यातुन लोक येत आहेत, जोपर्यंत हे बाहेरचे लोंढे थांबणार नाहीत तोपर्यंत कितीही विकास केला तरी ठाण्यासारख्या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही. डाॅ श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांनी खासदार म्हणून कितीही फंड आणला तरी फरक पडणार नाही. ठाणे जिल्ह्यात हे जे सगळे बाहेरुन येत आहेत यांचा सगळ्यात जास्ती येण्याचे प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे सात ते आठ महापालिका आहेत. बाहेरच्या लोकांनी इथली लोकसंख्या वाढविली आहे. यामुळेच या महापालिका अस्तित्वात आल्या आहेत. आता ठाणे जिल्हायावरील बा बाहेरील बोजा आवरण्याची गरज आहे. बाहेरचे असेच येत राहिले तर जो मुळ येथे रहाणारा आहे त्यांच्या हाताला काहीही लागणार नाही. बाहेरुन आलेल्यांमुळे लोकसंख्यावाढीचे प्रश्न उभे राहिले आहेत. या बाहेरच्या लोंढ्यांबाबत डाॅ. श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांनी निवडून आल्यावर संसदेत आवाज उठवायला हवा. महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच आहे. अमराठी माणसांना येथे मराठी बोलता आलेच पाहिजे, असे राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना ठणकावून सांगितले. महत्वाचे म्हणजे राज ठाकरे यांच्या या सभेला कळवा पूर्व येथील परप्रांतीय मोठ्यासंख्येने उपस्थित होते. परप्रांतीयांच्या उपस्थितीतच राज ठाकरे यांनी डाॅ श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांचे मतदार असलेल्या या परप्रांतीयांना लक्ष्य केल्याने डाॅ श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांची भलतीच अडचण झाल्याचे दिसून आले.
