बेकायदेशीर होर्डींग पडल्यामुळे आठ ठार, शेकडो जखमी

मुंबई : मुंबई आणि उपनगराला आज वादळी वाऱ्याचा तडाक बसला. सोसाट्याच्या वाऱ्याने मुंबईची पार दैना उडवून दिली. मुंबईतील घाटकोपरच्या छेडानगर जवळील पेट्रोलपंपावर महाकाय होर्डिंग पडून आठ ठार झालेत तर अनेकजण जखमी झालेत. पावसासहीत आलेल्या या वादळी वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना नोंदविल्या गेल्या. हा वारा इतका सोसाट्याचा की मोठमोठे बॅनर, जिने, झाडं अक्षरश: पत्त्यांसारखी कोसळली. शेकडोजण जखमी झाल्याच्या बातम्या आहेत. दरम्यान, दुपारी ताशी १६० किमी वेगाने वादळी वारा वाहत होता. त्यामुळे धूळ आणि कचऱ्यांच्या लोट मुंबईच्या आसमंतात उसळले होते.
या वादळी वाऱ्यामुळे लोकल ट्रेन, बस आणि मेट्रो यांचं टाईमटेबल कोलमडून गेलंय. अचानक आलेला पाऊस आणि उशीरानं धावणाऱ्या ट्रेन यामुळे ऑफिसमधून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले.

…तर अाठ जणांचे प्राण वाचले असते

छेडानगरजवळील पेट्रोलपंपावर कोसळलेल्या होर्डिंगमुळे तिघांचा मृत्यू झाला तर ५९ जण गंभीर जखमी झालेत. हे होर्डींग बेकायदेशीर होते आणि कालच ते होर्डींग हटवण्याचे आदेश मुंबई महानगर पालिकेतर्फे होर्डिंगच्या मालकाला देण्यात आले होते अशी माहीती किरीट सोमय्या यांनी दिली. घटनास्थळी भेटीस आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या घटनेच्या चौकशीचे दिले निर्देश असून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी प्रतिक्रीया शिंदे यांनी दिली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मुंबईतील वादळामुळे पेट्रोल पंपावर मोठं लोखंडी होर्डिंग कोसळून जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असून या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री साहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ही घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेची माहिती मिळताच मी लगेच मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आम्ही आयुक्तांना दिले आहेत. तसेच जे होर्डिंग अनाधिकृत आहेत, त्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही सरकारने आयुक्तांना दिले आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात सोमवारी दुपारपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. डोंबिवली आणि कल्याण भागात दुपारपासून आभाळ आलं होतं. त्यापाठोपाठ वादळाला सुरुवात झाली. अर्धा-पाऊण तासाच्या वादळानंतर रिमझिम सरी बरसायला सुरुवात झाली. अंबरनाथ आणि बदलापूर भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारादेखील पडल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. सलग तीन तास आकाशात काळोख पसरला होता. त्यामुळे भर दुपारी सायंकाळ झाल्याचा अनुभव येत होता. दुसऱ्या बाजूला या पावसामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. डोंबिवली, कल्याण भागात अनेक ठिकाणी वीज नसल्यामुळे लोकांच्या कामांचा खोळंबा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *