स्मरण
भागा वरखडे
छत्रपती संभाजी हे इतिहासातील फार मोठे नाव आहे. त्यांचे अवघे जीवनचरित्र अनेक थरारक घटनांनी भरले आहे. प्रेमाबरोबरच पराकोटीचा मत्सर, द्वेष झेलणार्या या राजाने अखेरच्या श्वासापर्यंत आपले स्वत्व जपले. प्राणाचे मोल देत अस्मिता जपली. स्वराज्याचे रक्षण करण्याचे मोठे काम त्यांनी केले. म्हणूनच हा राजा आजही इथल्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांंचेच हे पुण्यस्मरण.
पुढे जात राहणे हा प्रवाहाचाच नव्हे तर समाजाचाही गुणधर्म असतो. काळ नेहमी पुढेच जातो. विकासाचे नवनवीन टप्पे पार करतो. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ या केवळ काव्यपंक्तीच नव्हे, तर एक सार्वत्रिक विचारधाराही आहे. मात्र ‘जुने तेच सोने’ असे मानणाराही एक वर्ग याच समाजात नांदतो. काही व्यक्तिमत्त्व, व्यक्तिचित्र, व्यक्तिरेखा कालातीत असतात. वेगळ्या अर्थाने त्या अमर असतात. त्यांचे जीवनचरित्र कधीच काळाच्या चौकटीत सामावू वा अडकू शकत नाही. म्हणूनच पुढे जातानाही मान वळवून मागे पाहण्याचा मोह आवरता आवरत नाही, कारण मागे पडलेल्या प्रत्येक वळणावर कोणी ना कोणी भेटणार याची खात्री असते. छत्रपती संभाजी महाराज हे असेच एक नाव. दर वर्षी त्यांची जयंती उत्साहात साजरी होते. या निमित्ताने त्यांचे स्मरण होते. त्यांच्या शौर्याला, विरश्रीला प्रणिपात केला जातो. मानाचा मुजरा करत राजांना अभिवादन केले जाते. सध्याच्या समाजावर राजकारणाचा वर्ख अधिक गडद होत असताना तर काही वर्ग या दिवसाला वेगळ्या औचित्यानिशी साजरा करताना दिसतो. मात्र कारणे वेगवेगळी असली तरी स्वराज्य आणि धर्मरक्षणाचे पालन करताना जीवाची बाजी लावणार्या या इतिहासपुरुषाचे स्मरण होणे महत्त्वाचे.
आज छत्रपती संभाजी महाराजांचा आठव अनेक कारणांनी गरजेचा आहे. कारण अस्मिता जपणे म्हणजे काय, राज्यकर्त्याने कर्तव्याचे नेमकेपणाने आणि सर्व शक्तीनिशी पालन करणे म्हणजे काय, वैयक्तिक स्नेहापासून धर्मरक्षणापर्यंतची जबाबदारी स्विकारताना आणि सांभाळताना एखाद्याला नेमक्या किती संकटांमधून जावे लागते, आप्तस्नेह्यांचा रोष किती पराकोटीचा असू शकतो अशा वा यासारख्या अनेक गोष्टींचा उलगडा त्यांच्या संपूर्ण जीवितकार्यातून होतो. निश्चितच त्यामुळे जगण्याच्या विविध आयामांचाही परिचय होतो. शौर्य, धीरोदात्तपणा, क्षात्रतेज, निर्भिडता, प्रखर बुद्धिमत्ता अशा एक ना अनेक गुणांचा समुच्चय असणारे हे व्यक्तिमत्त्व राजकारण, समाजकारणाबरोबरच जगण्याचे आणि नातेसंबंधातील गुंतागुंतीचे अनेक पापुद्रे उलगडून दाखवते. म्हणूनच त्यांचे स्मरण आपल्याला विचार करण्यास भाग पाडते. १४ मे १६५७ रोजी पुरंदरवर संभाजीराजांचा जन्म झाला. दुर्दैवाने त्यांना अधिक काळ मातृसुख लाभले नाही. लहान असतानाच मातोश्री सईबाई बाळांतक्षयाच्या आजाराने निवर्तल्यामुळे धारावू या दुधाआईने त्यांची मायेने काळजी घेतली. आजी राजमाता जिजाऊ यांनी संभाजीराजांच्या संगोपनात जातीने लक्ष पुरवले. शिवाजीराजांनी आपल्या या राजपुत्राला घडवण्यासाठी चोख व्यवस्था लावून दिली होतीच. त्यामुळेच ते शस्त्रविद्या, विविध भाषा, न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, गणित आदींमध्ये तरबेज होते. विद्वान पंडितांकडून त्यांना मार्गदर्शन आणि शिक्षण मिळाले.
अवघे साडेसात वर्षांचे वय असतानाच औरंगजेबाचे सेनापती मिर्जाराजे जयसिंह आणि दिलेरखानाच्या रुपाने स्वराज्यावर मोठे संकट आले होते. त्यामुळे होणारे स्वराज्याचे नुकसान टाळण्यासाठी शिवाजीराजांनी त्यांच्याशी संघर्ष केला, पण त्यांच्या प्रचंड सामर्थ्यापुढे राजांना क्षणिक माघार घ्यावी लागली. पुरंदरचा तह करावा लागला. या तहानुसारच लहानग्या संभाजीराजांना मुघलांची मनसबदारी स्विकारावी लागली आणि शिवरायांना औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसासाठी आग्रा इथे जाणे भाग पडले. सहाजिकच मुघलांचा मनसबदार म्हणून सात वर्षांचे संभाजीमहाजार पित्यासह आग्य्राकडे निघाले. तिथेच हे दोघे औरंगजेबाच्या कैदेत अडकले. मात्र राजांनी शिताफीने सुटका करुन घेतली तरी संभाजीराजांना त्या लहान वयात आग्य्रापासून स्वराज्यापर्यंतचा जीवघेणा प्रवास करावा लागला. घरापासून शेकडो योजने दूर एका कुटुंबामध्ये काही काळ घालवावा लागला. हा त्यांच्या जीवनातील अत्यंत परीक्षेचा काळ होता. मात्र त्याच विद्वान पंडितांच्या घरात वास्तव्याला असताना संभाजीराजांना संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान प्राप्त झाले. त्यांना ब्रिजभाषाही शिकता आली. संभाजीराजांच्या जडणघडणीतला हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी दाखवलेली समज या टप्प्यामध्ये स्पष्ट दिसते. पुढे युवराज संभाजी म्हणून संभाजीराजांचे आयुष्य सुरू झाले. शिवाजी महाराजांनी त्यांना राज्यकारभाराचे धडे देण्याची व्यवस्था केली आणि त्यासाठीच कोकणात पाठवले.
इथे त्यांच्या आयुष्यातील दोन प्रसंगांची नोंद घ्यायलाच हवी. एक म्हणजे एकदा इंग्रज वकील राजगडावर आला होता. त्यावेळी शिवाजीराजे उपस्थित नसल्याने संभाजीराजांनी त्यांचे स्वागत केले. पुढे या वकिलाने लिहून ठेवले आहे की, संभाजीराजांकडून रायगडाची सगळी गोपनीय माहिती मिळवण्याचा माझा प्रयत्न होता. त्याच हेतूने मी युवराजांना विविध प्रश्न विचारले आणि रायगडाची सुरक्षा व्यवस्था वा मराठी राज्याविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण या चाणाक्ष युवराजाने कोणतीही माहिती दिली नाहीच. उलटपक्षी, माझ्याकडूनच इंग्रज आणि इंग्लंडशी संबंधित अनेक प्रश्न विचारुन माहिती घेतली. एका इंग्रज वकिलाने लिहून ठेवलेल्या या तपशीलावरुनही संभाजीराजांच्या चाणाक्षपणाचे दर्शन घडते. पुढे संभाजीमहाराज आणि त्यांच्या सावत्र मातोश्री सोयराबाई यांच्यात काही काळ संघर्ष झाला तर त्याच काळात काही कारभार्यांशीही त्यांचा झगडा झाला. काळ पुढे सरकताना तो संघर्ष आणखी तीव्र होत गेला. या संघर्षाच्या परिणामस्वरुप संभाजीराजांना दिलेरखानाकडे जावे लागले. हा राजकारणाचा एक भाग असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. शिवाजीराजांच्या पश्चात संभाजी महाराजांवर स्वराज्यजतनाची फार मोठी जबाबदारी आली. ती त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पेलली. हा देखील त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता.
संभाजीराजांनी एकाच वेळी स्वराज्याच्या अनेक शत्रूंशी यशस्वी मुकाबला केला. त्यांचा सर्वात मोठा संघर्ष औरंगजेबाच्या प्रचंड मोठ्या साम्राज्याशी होता. शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर औरंगजेबाच्या मतात हिंदवी स्वराज्य जिंकण्याची महत्त्वाकांक्षा उफाळून आली. त्याच भूमिकेतून तो सर्व सामर्थ्यानिशी हिंदवी स्वराज्यावर चालून आला. हे करत असताना त्याने स्वराज्याच्या सर्व शत्रूंना राजांविरुद्ध भडकवले आणि उठाव करण्यास भाग पाडले. पण अशा अत्यंत बिकट समयीदेखील संभाजीराजांनी पराक्रम, चातुर्य, मुत्सद्देगिरी आणि कर्तृत्वाचे दर्शन घडवत हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. तब्बल नऊ वर्षे त्यांनी निकराचा संघर्ष केला. औरंगजेबाच्या चिथावणीवरुनच इंग्रजांनी मराठी राज्यांमध्ये काही कागाळ्या केल्या. परिणामस्वरुप इंग्रजांनीही स्वराज्यावर आक्रमण केले पण राजांनी त्यांनाही धडा शिकवला आणि मैत्रीचा हात पुढे करण्यास भाग पाडले. यामागेही संभाजीमहाराजांची दूरदृष्टी दिसून येते. पोर्तुगीज, जंजिरेकर सिद्धी आणि मुगलांसारख्या ताकदवान शत्रूंशी संघर्ष करत असताना आपल्याला इंग्रजांसारख्या पाश्चात्य शत्रूकडून मदत मिळेल हे त्यांनी जाणले होते. त्या काळी आपण दारुगोळा, तोफा, बंदुका आणि धातू यासाठी पाश्चात्य युरोपियन सत्तांवर अवलंबून होतो. ही रसद सतत मिळत रहावी यासाठी संभाजी महाराजांनी शरण आलेल्या इंग्रजांशी तह केला आणि त्याचा परिणाम म्हणून इंग्रजांकडून राजांना सर्व प्रकारची रसद मिळण्याचा मार्ग खुला झाला. यातूनही संभाजीराजांचे चातुर्य दिसून येते.
औरंगजेबाच्या चिथावणीवरुन जंजिरेकर सिद्धीने कोकणातील मराठी मुलखात शिरुन जाळपोळ, लुटालुट, अत्याचार सुरू केले होते. हे बघून त्याला धडा शिकवण्यासाठी संभाजीराजे त्या मोहिमेवर गेले आणि राजपुरीपर्यंत धडक मारली. राजपुरी जिंकल्यानंतर जंजिर्याचा किल्ला जिंकण्यासाठी आवश्यक त्या क्षमतेचे आरमार नसल्यामुळे संभाजीमहाराजांनी जमिनीवरचा सेतू बांधण्याचा प्रयत्न केला. ही आगळीवेगळी कल्पना होती. मात्र त्याच वेळी मुघलांची स्वारी कल्याण-भिवंडीपर्यंत आल्यामुळे त्यांना ही मोहीम नाईलाजाने अर्धवट सोडून तिकडे जावे लागले. पण या स्वारीमुळे जंजिरेकर सिद्धीला मोठा धडा मिळाला आणि पुढे संभाजीराजांच्या हयातीपर्यंत तो पुन्हा स्वराज्याच्या वाट्याला गेला नाही.
औरंगजेबालाही संभाजीराजांकडून हिंदवी स्वराज्य जिंकून घेता आले नाही. अखेरच्या काळात औरंगजेबाने राजांना प्रचंड त्रास दिला. एकूण ४२ दिवस महाराजांनी शत्रूविरुद्ध केलेला तो आगळावेगळा संघर्ष म्हणावा लागेल. अटक केल्यानंतर अभय देण्याच्या बदल्यात औरंगजेबाने चार मागण्या केल्या होत्या. मुघल फौजेतील फितूर झालेल्यांची नावे सांगणे, मराठी राज्याचा खजिना कोठे आहे ते सांगणे, छत्रपती म्हणून स्वराज्यातील सर्व किल्लेदारांना आपले किल्ले मुघलांच्या ताब्यात देण्याविषयी पत्र पाठवणे आणि इस्लाम धर्माचा स्विकार करणे या त्या चार मागण्या होत्या. मात्र महाराजांनी त्या फेटाळल्या आणि जीवाची बाजी लावत प्रतिकार केला. अशा या थोर राजाला मानाचा मुजरा.
(अद्वैत फीचर्स)