मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने ११ व १२ मे २०२४ दरम्यान एल. जे. ट्रेनिंग सेन्टर, दादर, मुंबई येथे पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी व पुणे येथून स्थानिक, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकंदर ४० पंच सहभागी झाले होते. यामध्ये तीन महिलांचाही समावेश होता. दोन दिवस झालेल्या या शिबिरातील पंचांना आंतर राष्ट्रीय कॅरम पंच श्री अजित सावंत व श्री केतन चिखले यांनी कॅरमच्या नियमांची सविस्तर माहिती दिली. शिवाय महाराष्ट्रात भविष्यात अधिक गुणवान पंच तयार होण्यासाठी स्वेच्छेने मार्गदर्शन करण्याची तयारी दाखविली. कॅरमच्या नियमावलीतील प्रत्येक नियमांवर या शिबिरात चर्चा करण्यात आली. शिवाय कॅरम बोर्ड वर सामन्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर कृतीद्वारे प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. यावेळी आंतर राष्ट्रीय पंच श्री परविंदर सिंग ग्रोव्हर, श्री आशिष बागकार, राष्ट्रीय पंच श्री साईप्रकाश कानिटकर, श्री रमेश चव्हाण यांनीही शिबिरात सहभागी झालेल्या पंचांना विशेष मार्गदर्शन केले. स्पर्धेत पंचांचा सहभाग अतिशय महत्वाचा असून त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे कोणत्याही खेळाडूचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी पंचांची असते. त्यामुळे गेली दोन वर्षे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन अशा शिबिराचे आयोजन करत असल्याचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव श्री अरुण केदार यांनी सांगितले. शिबिराची सांगता करताना श्री अजित सावंत यांनी या शिबिरामुळे झालेला सकारात्मक बदल यापुढे सामन्यात दिसेल अशी अशा व्यक्त केली. तर श्री केतन चिखले यांनी काम करताना पंचाने आपली भूमिका निष्पक्षपणे मांडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शिबिरात सहभागी झालेल्या पंचानीही या शिबिराचा फायदा झाला असून यापुढे अधिक सतर्क राहण्याचे आश्वासन दिले. तर काहींनी या शिबिरामुळे पंचांची उजळणी झाल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री यतिन ठाकूर व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष श्री धनंजय पवार उपस्थित होते.