अनिल ठाणेकर
ठाणे : ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्जचे पेव फुटले असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेने यावर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.
घाटकोपर येथे अवाढव्य होर्डींग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकामे, अनधिकृत होर्डिंग्ज आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले, ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच धोकादायक होर्डींगचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे महापालिकेने देखील याबाबत मागे राहू नये. निवडणूक असली तरी प्रशासनाने शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई करावी, अशी मागणी आ. संजय केळकर यांनी केली.
चौकट
एखाद्या होर्डींगमुळे मेट्रोचे काम रखडले असेल आणि ते अनधिकृत असेल तर त्यावर तत्काळ कारवाई करण्यासाठी मी प्रशासनाकडे पाठपुरावा करेन.अनधिकृत बांधकामांवर मागील काळात तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई केली, पण संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. अशा इमारती काही काळानंतर दुर्घटनाग्रस्त होतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो. अनधिकृत बांधकाम प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आ. संजय केळकर यांनी केली.