मुंबई : भारतीय संविधानिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी मतदारांनी सजग आणि निर्भय मतदान करावे, यासाठी मुंबईत ‘निर्भय बनो’ जाहीर सभा घेण्यात आली. ही सभा दुभाषी मैदान, गुजरात सोसायटी रोड, विलेपार्ले पूर्व येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सामाजिक संघटना सरसावल्याचे दिसून आले.

सभेमध्ये सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ वकील असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर आणि सीताराम शेलार यांनी मार्गदर्शन केले. सध्या लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. निवडणुकीचे चार टप्पे पार पाडले असून पाचवा टप्पा येऊ घातला आहे. मुंबईतील मतदानही पाचव्या टप्प्यात २० मे रोजी होत आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर ती घसरत असल्याचे दिसते. लोकशाहीसाठी ही चिंतेची बाब आहे. पाचव्या टप्प्यात अशी परिस्थिती राहू नये. जास्तीतजास्त लोकांनी मतदान करावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे, असे ‘भारत जोडो’ अभियानाचे प्रमुख डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सांगितले.

राष्ट्रीय कर्तव्य बजावणे गरजेचे

मुंबईतील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, याकरिता संविधानिक मूल्यांना अनुसरून मतदान करावे. आणि आपल्या लोकशाहीच्या उत्सवात आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, ही आज आपल्या देशाची गरज आहे, असे आवाहन करण्यासाठी आम्ही ‘भारत जोडो अभियान आणि निर्भय बनो’ जाहीर सभेत करत असल्याचे निर्भय बनो अभियानाचे सहसमन्वयक सीताराम शेलार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *