स्वाती घोसाळकर

मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील अंतिम टप्यासाठी भाजपाने आज मुंबईत जोरदार मोर्चेबांधणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शोला आज गर्दीचे तुफान आले होते. मोदींची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी घाटकोपर ते मुलुंड एकच गर्दी केली होती. पारंपारिक वेशात मुंबईकरांनी आज मोदींचे दणक्यात स्वागत केले.

ढोल-ताशांचा गजर, गुलालाची आणि फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि देशभरातली पारंपारिक वेषभुषेत दुतर्फा गर्दी केलेल्या नागरीकांनी रस्ते फुलुन गेले होते. अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीज असा हा रोड शो आयोजित करण्यात आला.

या रोड शोमध्ये मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होते. अजित पवार यांची प्रकृती बिघडल्याने ते या सभेत उपस्थित राहू शकले नाहीत.या रोड शोमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती.

अशोक सिल्क मिल परिसरातून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केलं. यानंतर त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली. गुजराती बहुल विभाग असला तरी ठिकठीकाणी ढोल ताशा आणि लेझिमच्या जल्लोषाने मराठी वातावरण तयार करण्यात आले होते. विशेषता पारंपारिक कोळी वेषभुषेतील कोळी बांधवांनी कोळीनृत्य सादर करत मोदींचं केलेल स्वागत लक्षवेधी होते.

येत्या २० मे रोजी राज्यात शेवटचं पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या शेवटच्या टप्प्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकमधील एकूण 13 जागांवर मतदान होणार आहे. यापैकी सहा मतदारसंघ हे मुंबईतील आहेत. मोदींनी त्यांच्या आजच्या दौऱ्यातून या सर्व जागांचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला. मोदींची आज नाशिकमध्ये सभा पार पडली. त्यानंतर कल्याणमध्ये सभा पार पडली. यानंतर  मोदी थेट मुंबईच्या रस्त्यावर उतरले. नरेंद्र मोदी यांचा मुंबईतला हा पहिला रोड शो होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *