पंतप्रधान मोदींचे जनतेला शब्द
कल्याण : तुमची स्वप्ने हाज मोदींचा संकल्प आहे, येत्या ४ जूननंतरही याच ताकदीने आणि मेहनतीने मी काम करणार, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणमधील सभेत जनतेला दिला. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीला माझा नमस्कार, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी भाषणाची मराठीतून सुरुवात केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पित करतो. मी कल्याण भूमीवर आपला आशीर्वाद मागायला आलो आहे. पहिल्यांदा प्रत्येक घरात पाणी येताना बघत आहे. देश पहिल्यांदा 25 कोटी भाऊ-बहिणींना गरिबीतून बाहेर पडत असल्याचे बघत आहोत. पहिल्यांदा गरिबांजवळ आजारपणात मोफत उपचारासाठी गॅरेंटी कार्ड आहे. गरिबांना पाहिले प्राधान्य दिले आहे. गरिबांसाठी घरे बांधण्याचं काम सुरु आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे.
सरकार बनल्यानंतर पहिल्या 100 दिवसात काय काम करणार यासाठी नियोजन केलं आहे, असं मोदींनी सांगितलं आहे. सरकारचं ब्ल्यू प्रिंट रेडी आहे. तुम्ही मला नवीन कल्पना लिहून पाठवा, त्यातील निवडक कल्पनांवर आम्ही काम करू आणि विकास करू, असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, तुमची स्वप्ने ही मोदींचा संकल्प आहे. माझा प्रत्येक क्षण आणि तुमच्यासाठी आणि देशासाठी असेल, असंही मोदींनी म्हटलं आहे.
मोदींचा राजकीय प्रवास म्हणजे ‘अग्निपथ’- शिंदे
नरेंद्र मोदींचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास म्हणजे हरिवशंराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेप्रमाणे असून ते जे बोलतात ते करतात अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्मा असा आहे की आपण आता कल्याण, ठाणे आणि भिवंडी या तीनही जागा जिंकतोय असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोदींच्या चेहऱ्यावर मी कधीही थकवा आणि उदासी पाहिली नाही. २०१४ पूर्वी कोणताही पंतप्रधान कल्याणमध्ये आला नव्हता. मोदी मात्र तीन वेळा कल्याणमध्ये आले. कपिल पाटील, श्रीकांत शिंदें, नरेश म्हस्केंना मत म्हणजे मोदींना मत. एक अकेला मोदी अनेकांना भारी पडतोय. जो केहता है, वो करता है, त्यालाच मोदी म्हणतात. ‘प्राण जाए पर वचन ना जाए’ या प्रमाणे ते काम करत असून त्यांनी 370 कलम हटवलं, राम मंदिर बांधलं. मोदीजी प्रत्येक सभेत भारताच्या उज्ज्वल भवितव्याचं व्हिजन मांडतात.
दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळणारे मोदी, पाकिस्तानला धडा शिकवणारे मोदी. त्यामुळे देशातील 140 कोटी जनतेने त्यांना पु्न्हा एकदा पंतप्रधान करण्याचं ठरवलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.