ठाणे पुढील तीन दिवस ठाणे लोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली यांचा धडाका असणार आहे. त्यातही महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा शुक्रवारी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाण्यात प्रथमच या दोनही नेत्यांच्या सभा होणार आहेत. तर महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी रोड शो घेण्यात येणार असून त्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे.
ठाणे लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुरुवारी ठाण्यात सांयकाळी गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या रस्त्यावर महाविकास आघाडीची सभा घेण्यात येणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे आदींची देखील हजेरी लागणार आहे.
दुसरीकडे गुरुवारी दुपारी २ वाजता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक विनोद तावडे घेणार आहेत. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो किंवा सभा घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील दुपारी ३ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.