नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यावर आमचाच अधिकार आहे, असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेसचे नेते आज पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याचे सांगत आहेत. पाकव्याप्त काश्मिरची मागणी करत नाहीत. मला त्यांना विचारायचे आहे की, १३० कोटी लोकसंख्येचा देश कोणाच्या तरी भीतीने आपले हक्क सोडणार का? असा सवाल करत अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
याचबरोबर, सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केल्याबद्दल अमित शाह म्हणाले, “हा काही नियमित निर्णय नाही, असे मला वाटते. या देशातील अनेक लोकांचा म्हणणे आहे की, स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली आहे”.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वायनाड (केरळ) आणि रायबरेली (उत्तर प्रदेश) मधून लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल अमित शाह म्हणाले, “कोणीही कोठूनही निवडणूक लढवू शकतो, पण राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वीच सांगायला हवे होते की, ते दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ते लपवणे योग्य नाही असे मला वाटते. त्यांनी वायनाडच्या लोकांना त्याबद्दल सांगायला हवे होते, जेव्हा तुम्ही मतदानोत्तर सर्वेक्षणात धोका पाहता आणि मग तुम्ही रायबरलीला येता, हे मला योग्य वाटत नाही.असेही शहा म्हणाले.
