राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना व स्थलांतरित लोकसंख्या यामुळे हे क्षेत्र हिवताप व डेंग्यू या आजारांसाठी संवेदनशील आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वेक्षण तसेच साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासअळी नाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण तसेच  राबविण्यात येणा-या जनजागृती मोहीमा यांच्या माध्यमातून प्राधान्याने हिवताप व डेंग्यू आजारांचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या अनुषंगाने 16 मे 2024 रोजीच्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 16 मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे यावर्षीचे घोषवाक्य ‘समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा ( Connect With Community, Control Dengue)‘ जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार डेंग्यूविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग घेऊन डेंग्यू आजारास प्रतिबंध करणे हे राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याबाबत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.

यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू प्रतिबंधात्मक तसेच जनजागृतीपर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिनी अर्थात 16 मे रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात मोठी बांधकामे वा झोपडपट्टी अशा एकूण 38 ठिकाणी डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, 16 ते 21 मे 2024 या कालावधीत प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालये, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक व खाजगी प्रयोगशाळा प्रमुख यांची प्रत्यक्ष सभा घेऊन त्यांना हिवताप, डेंग्यू,  साथरोग, जलजन्यरोग याबाबत संबोधित करण्यात येणार आहे.

याच 16 ते 21 मे कालावधीत डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कामगारांच्या सभा घेऊन फवारणी काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

21 मे  रोजी मुख्यालयातील आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.डेंग्यू हा विषाणुजन्य आजार असून, डेंग्यू विषाणू संक्रमित एडिस इजिप्ती या डासाची मादी चावल्यामुळे तो प्रसारित होतो. हा एडिस इजिप्ती डास गच्चीवरील व घराच्या परिसरातील पाण्याच्या साठ्यात तसेच भंगार साहित्य, टायर्स, रिकाम्या बाटल्या, करवंटया, रंगाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, घरावर टाकलेले प्लास्टिक आच्छादन, कुंडयांखालील ताट, कुलर्समधील पाणी अशा पाणी साचलेल्या ठिकाणी अंडी घालतो आणि डास उत्पत्ती होते. ही डास उत्पत्ती स्थाने होऊ न देण्याची काळजी घेणे व झाल्यास ती तात्काळ नष्ट करणे गरजेचे ठरते.

डेंग्यू आजाराची लक्षणे म्हणजे – एकाएकी तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी स्नायुदुखी, सांधेदुखी व उलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी जास्त होणे, अंगावर पुरळ येणे अशा प्रकारची असून अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ वैद्यकिय सल्ला घेणे आत्यंतिक गरजेचे आहे.

डेंग्यू आजार रोखण्यासाठी – आठवड्यातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करुन घासून – पुसून कोरडी करावीत, घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवावेत, झाकण नसल्यास कापडाने झाकावे, घराच्या परिसरातील अडगळीचे सहित्य नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवावा, डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात व झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, गॅलेरीत / छतावर पाणी साठेल असे भंगार सामान ठेवू नये, गळके नळ आणि पाईपलाईन वेळीच दुरुस्त करावी, कोणाताही ताप अंगावर काढू नये – अशा प्रकारची काळजी घेण्यात यावी.

नवी मुंबईकर नागरिकांनी डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात आणि हिवताप / डेंग्यूची लक्षणे आढळल्यास नजिकच्या महानगरपालिका रुग्णालयात किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *