काहीतरी नवीन…

श्याम तारे

आपल्या घरात आपले लक्ष काही दिवस एखाद्या कोपऱ्याकडे राहिले नाही की लगेच तेथे कोळी कीटक आपले चिकट जाळे पसरवून आपला संसार थाटतो आणि अडकलेल्या छोट्या जीवांवर आपली भूक भागवतो असे दिसते. पण चक्क ओढ्यात, तलावात किंवा समुद्रात सुद्धा शिंपल्यांच्या आडोशाने त्यांनी आपले बस्तान बसवले आहे असे दिसते. विज्ञान म्हणते की यासाठी त्यांना त्यांच्या शरीरावरील केस आणि त्यात साठणारे बुडबुडे यांची मदत मिळत असते. पाण्यात रहायला गेलेल्या कोळी कीटकांच्या जातींनी अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने आपली जगण्याची जीवनशैली विकसित केली आहे.
कोळी कीटकांचा प्रचंड अभ्यास असलेल्या न्यूझीलंड मधील एक जीवशास्त्रज्ञ झिमेना नेल्सन म्हणतात की कोळी कीटकांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची जिद्द आश्चर्यकारक आहे परंतु पाण्यात राहणारे हे कोळी कीटक सहजासहजी सापडत देखील नाहीत. संशोधकांना त्यांचा पाठलाग करावा लागतो. कधी ते लपून बसतात तर कधी कुठे अदृश्य होतात ते कळतच नाही. २०१९ च्या एका अहवालानुसार या कीटकांच्या केवळ २१ जाती संशोधकांना माहिती आहेत आणि इतर अनेक जाती अजूनही शोधायच्या आहेत. माहिती असलेल्या कोळी कीटकांच्या पैकी केवळ तीन दशांश टक्के जाती या पाण्यात राहणाऱ्या आहेत असे मानले जाते आणि त्यापैकी बहुतेक जाती या गोड्या पाण्याजवळ असतात असे दिसले आहे.
जगात कोळी कीटक साधारणपणे ४० कोटी वर्षांपूर्वी पाण्यातूनच अवतरले असावेत असे मानले जाते. आज ज्या जाती पाण्यात रहायला गेल्या आहेत त्या कदाचित जमिनीवरील परिस्थिती त्यांना असुरक्षित वाटली असणार म्हणूनही असतील. मानवाप्रमाणेच कोळी कीटक देखील हवेवरच अवलंबून असतात. पाण्यात असताना त्यांचे केस पाण्याबाहेर असतात आणि ते हवा शोषून घेतात. इतर वेळी या केसांमध्ये पाण्याचे छोटे बुडबुडे लपलेले असतात. या कीटकांना खेकडे आणि पाण्यातील इतर शिकारी प्राण्यांचीही भीती असते. अमेरिकेतील कोळी कीटक तज्ञ सारा क्र्यूज यांच्या मते या कीटकांकडे जन्मत:च पाण्याशी मैत्रीचे काही गुण असतात. त्यांचे शरीर मेणासारखे आणि त्यामुळे जलरोधक असते. त्यांचे आठ पाय हे देखील त्यांना पाण्यात सहज हालचाल करायला मदत करतात.
इतर काही कोळी कीटक जाती आपले घरटे रेतीमध्ये बनवतात आणि त्याचे ‘वॉटरप्रूफिंग’ स्वत:च तयार केलेल्या जलरोधक अशा जाळ्याने करतात. काही जातीच्या कोळी कीटकांनी आपली जल-मैत्री वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवली आहे. आर्गीरोनेटा अक्वेटिका ही एकच अशी कोळी कीटक जाती आहे जी पाण्याखाली श्वास घेते, शिकार करते आणि इतर कीटकांवर ताव सुद्धा मारते. पाण्यातील हे कोळी कीटक युरोप आणि आशिया खंडात आहेत.
पाण्यातील कोळी कीटकांपैकी सर्वात कठीण जीवन समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या जातीचे असते. कारण येथे क्षणात उन असते आणि त्याचा आनंद घेत असलेल्या कीटकावर एकाएकी येणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या जबरदस्त लाटेचा तडाखा बसतो. जगातील पाणथळ विभाग कमी झाले तर पाण्यात जीवन जगणाऱ्या कोळी कीटकांच्या जाती नष्ट होऊ शकतील.
खाऱ्या पाण्यातील कोळी कीटक सातत्याने खारे पाणी पीत असतात त्यांच्या शारीरातील मिठावर ते कसे नियंत्रण ठेवीत असतील असा संशोधकांच्या पुढे एक मजेदार प्रश्न आहे.
प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *