ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोग आणि सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना महिलांची मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली, तर मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करून लोकशाहीतील निवडणूक हा उत्सव उत्साहात साजरा करावा, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले.
सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतर्फे मतदारांमध्ये जागृतीसाठी अभियान सुरू आहे. या अभियानातंर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी, मतदान याच्याबद्दल जागरुकता निर्माण केली जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे महापालिका मुख्यालयात कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महिला बचत गटांच्या प्रमुख, सचिव, इतर पदाधिकारी यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत, महिलांनी एखादी गोष्ट ठरवली तर अशक्य काही नाही. दैनंदिन व्यवहारांच्या धावपळीतून महिलांनी मतदानासाठी वेळ काढावा. स्वत: मतदान करावे, कुटुंबियांनी मतदान केले आहे याची खात्री करून घ्यावी. बचत गटांच्या कार्यक्रमात मतदानाबद्गल सांगावे, असे आवाहन श्री. माळवी यांनी केले.
लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आपल्या जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आपल्याला आतापासून तयारी करावी लागेल. यादीत आपले, कुटुंबियांचे नाव आहे का, त्यात काही दुरुस्तीची गरज आहे का, कोणाचे नाव नोंदवायचे राहिले आहे का, हे तपासून पाहण्याची ही वेळ आहे. नामांकन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत आपल्याला यादीत नाव घेता येते. ही सगळी यादी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यात मतदान केंद्रासह सर्व माहितीची नोंद आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त (निवडणूक) उमेश बिरारी यांनी दिली. जास्तीत जास्त महिलांनी मतदान करावे. त्यासाठी त्या दिवशीच्या दैनंदिन कार्यक्रमात थोडा बदल करावा. हे राष्ट्रीय कार्य असून त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावे, असेही बिरारी म्हणाले. या बैठकीत, महिला बचत गटाच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. मतदानाच्या काळात जोडून सुटी घेऊन कुठेही जाऊ नये, असे आवाहन एका महिला बचत गटाच्या प्रमुखांनी केले. मीरा-भाईंदर महापालिकेचे सहायक आयुक्त सुनील यादव यांनी सांगितले की, मतदार याद्यांसाठी गेले दोन वर्षे काम सुरू होते. त्यात अजूनही दुरुस्ती करता येईल. तसेच, मतदार यादीत नाव असेल आणि मतदान ओळखपत्र नसेल तरी इतर ११ पुराव्यांपैकी एक पुरावा असला तर मतदान करता येते. उपायुक्त (समाजविकास) वर्षा दिक्षीत यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे संचालन एनयूएलएमचे व्यवस्थापक मनीष वाघमारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *