मुंबई: येस बँक आणि डीएचएफएलच्या घोटाळ्यात अटकेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अखेर जामीन मंजूर झाला असून एक लाखांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अविनाश भोसले यांना २६ मे २०२२ रोजी येस बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली होती. तेव्हापासून ते गेली दोन वर्षे जेलमध्येच होते.
मुंबई सत्र न्यायालयानं गेल्यावर्षी जामीन फेटाळल्यानंतर अविनाश भोसले यांनी जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली. हायकोर्टानं आपला राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी जाहीर केला. अविनाश भोसले यांना परवानगीविना देशाबाहेर जाण्यास मनाई करत तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.