स्वाती घोसाळकर
मुंबई : लोकसभेच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यासाठी उद्या सोमवार २० मे रोजी मतदान होत आहे. उद्या महाराष्ट्रातील होणाऱ्या १३ लोकसभेच्या जागेपैकी मुंबई आणि ठाण्यातील लोकसभा जागेकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचा जन्म ज्या मुंबईत झाला आणि शिवसेनेला ज्या ठाण्याने महानगरपालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा सत्तेची चव चाखायला दिली त्या मुंबई आणि ठाण्याचा बालेकिल्ला कोण राखतो यावर शिवसेना कुणाची याचा फैसला होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्ध्व ठाकरे मशाल चिन्ह घेऊन तर मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे धनुष्यबाण घेऊन मायबाप जनतेच्या न्यायालयात मतांच्या रुपाने मत मागणार आहे. या लोकसभा निवडणूकीच्या निकालाचा प्रभाव महाराष्ट्रातील पुढील राजकारणावर पडणार असल्यामुळे या पाचव्या टप्प्यातील निवडणूकांकडे देशाचे लक्ष लागले आहे.
विधीमंडळात एकनाथ शिंदे गटांच्या आमदारांचे प्राबल्य असल्याने निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षही उद्धव ठाकरेंकडून काढून घेऊन एकनाथ शिंदे यांना दिला. उद्याच्या निवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त निवडूण आल्यासा त्याचा सुप्रीम कोर्टातील केसवर किती प्रभाव पडेल यावर राजकीय चर्चेला जोर धरू लागला आहे. विशेषता एकनाथ शिंदे यांची शिवेसेना फक्त १४ जागांवर निवडणूका लढत आहे तर उध्दव ठाकरेंची शिवसेना २२ जागांवर निवडणूक लढत आहे. त्यामुळे सहाजिकच ठाकरेंच्या मतांची टक्केवारी ही शिंदे गटाच्या शिवसेनेपेक्षा जास्तच असणार आहे. २०१४ साली भाजपाने युती तोडल्यानंतर शिवसेनेचे मोदी लाटेतही त्यांच्या विरोधात लढून ६३ आमदार निवडून आले होते तर युतीत असताना २००९ साली ४६ आणि २०१९ साली ५५ उमेदवार निवडून आले होते. यावरूनच २०१७ साली युतीत आमची २५ वर्षे सडली असे उद्गार उद्धव ठाकेर यांनी काढले होते.
या पाचव्या टप्प्यात मुंबईतील चार आणि ठाणे शहरातील एक अशा पाच जाग उद्धव ठाकरे यांची शिवसेना लढत आहे. तर शिंदेची सेना मुंबईत तीन तर ठाण्यात एक अशा चार जागा लढत आहे. थोडक्यात मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईत तसेच ठाण्यातील एका जागेवर थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणात थेट मुकाबला रंगणार आहे. विशेष म्हणजे या चारपैकी अरविंद सावंत (दक्षिण मुंबई) आणि राजन विचारे ( ठाणे ) हे दोन खासदार ठाकरेंकडे तर राजन विचारे (दक्षिण मध्य मुंबई) आणि गजानन किर्तीकर (वायव्य मुंबई) हे दोन खासदार शिंदेंच्या सेनेकडे आहेत. त्यापैकी गजानन किर्तीकर निवडणूक लढवत नाहीत मात्र त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर ठाकरेंकडून निवडणूक लढवित आहे.
या चारही मतदार संघात यापुर्वीच्या बुहतेक निवडणूकीत शिवसेनेचा विरोधी उमेदवार हा काँग्रेसचा होता. आजा हीच काँग्रेस ठाकरेंसोबत आहे. आणि काँग्रेसमध्ये फुट पडली नसल्यामुळे त्यांचे मतदार अजूनही एकगट्टा आहेत. ही ठाकरेंची जमेची बाजू आहे. राष्ट्रवादीचा मुंबईत तसा फासरा प्रभाव गेल्या दशकात राहीलेला नाही. जो काही टक्का मुंबईत असेल तो बहुतांश शरद पवारांकडे झुकलेला असेल, त्याचाही फायदा ठाकरे यांना होईल. त्याशिवाय मुस्लिम मतांचा कोरोनानंतर ठाकरेंना मिळणारा वाढता पाठींबा शिंदेची चिंता वाढवणारा आहा. एकुणच ठाकरे मुंबई आणि ठाण्यातील किती उमेदवार मशालीकडे वळवतात यावर मुंबईत विजयाचे गणित असेल.
ठाण्यात राजन विचारे यांनी एकनिष्ठ आणि गद्दार हा मुद्दा उचलून धरला आहे. तेथेही विचारे यांना राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाट आणि काँग्रेसची रसद मिळालेली आहे. उलट नरेश म्हस्के यांना पक्षातील असंतोषाचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत करावा लागत आहे. या सगळ्या पार्श्वभुमीवर उद्या मतदार राजा आपला अंतिम फैसला सुनावण्यासाठी बाहेर पडणार आहे.
दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ठाणे शहर, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.
राज्यातील 13 जागांसाठी आज होणार मतदान
मुंबईतील सहा जागांसह राज्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक, या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना वि. शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती.
मुंबईतील 6 जागांवर कोणाला उमेदवारी ?
दक्षिण मुंबई- अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव – शिवसेना विरुद्ध शिवसेना
दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे – शिवसेना विरुद्ध शिवसेना
उत्तर पूर्व मुंबई- संजय दिना पाटील विरुद्ध मिहीर कोटेचा – भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना
वायव्य मुंबई– अमोल किर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर – शिवसेना विरुद्ध शिवसेना
ठाणे – राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के – शिवसेना विरुद्ध शिवसेना