मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार करीत असलेल्या उद्धव ठाकरेंना स्वता मुख्यमंत्री व्हायचे होते या आरोपांना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी सनसनीत उत्तर दिले. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदासाठी कधीच आग्रह नव्हता, आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी राजी केले असा खुलासाच आज शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला.
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सत्ता स्थापन करताना मुख्यमंत्री कोणाला बनवायचं हा प्रश्न शिवसेनेसह इतही दोन्ही पक्षांपुढे होता. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यासंदर्भात आता स्वत: शरद पवारांनी विधिमंडळ बैठकीत घडलेला किस्सा सांगितला आहे. दरम्यान या मुलाखतीत पवारांनी एकनाथ शिंदेंचं नाव आमच्यासमोर आलं नव्हतं, असा गौप्यस्फोटही केला.
”मुख्यमंत्री कोणाला करायचं याबाबत त्यावेळी जी बैठक झाली, त्या बैठकीत आमच्याकडे एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा नव्हती. शिवसेना पक्षांतर्गत शिंदेंच्या नावाची चर्चा असेल, पण आमच्याकडे नव्हती. आमची एकनाथ शिंदेंबाबत काही तक्रार नव्हती. आत्ताही ते आमच्यासोबत चांगले संबंध ठेवतात, पण त्यांच्यासोबत तेव्हा आमची जवळीक नव्हती. ज्यावेळी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली, तेव्हा नेतृत्व कोणाला द्यायचं असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी, सर्वजण गप्प बसले होते, माझ्या शेजारी उद्धव ठाकरे बसले होते. मग, मी उद्धव ठाकरेंचा हात हाती घेऊन उंचावला, यांचा विचार करावा असंही सूचवलं. त्यावर, सर्वांनीच टाळ्या वाजवून दाद दिली, असा किस्सा शरद पवार यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचा स्वत:च्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रह नव्हता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बाळासाहेबांनंतर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व मान्य केलंय. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला मी मुख्यमंत्री होण्याचं सूचवलं होतं. शिवसेनेमध्ये अंतर्गत एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा झाली होती, हे नंतर माझ्या लक्षात आलं, तत्पूर्वी आमचा कोणाचाच सहभाग त्यांच्यातील चर्चेत नव्हता, असेही पवार यांनी सांगितले.