ठाणे: शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री केले नसते, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. मी किमान पाच वेळा तरी त्यांना भाजपसोबत युती करा असे सांगितले होते. त्यांना ते मान्य नव्हते. कारण मुख्यमंत्री पदावर त्यांचा डोळा होता, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री पदावर असूनही तुमच्यावर दिल्लीचा कंट्रोल असल्याची चर्चा असते या प्रश्नावर, “हे पुन्हा विरोधकांनी रचलेले कथानक आहे”, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. “एक गोष्ट पक्की ध्यानात ठेवा की मी तळागाळातील कार्यकर्ता आहे. मी शिवसेना कधीही कोणाच्या दावणीला बांधली नाही आणि बांधणार ही नाही. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात मी तळ ठोकून बसलो त्याबद्दल ते माझ्यावर टिका करतात. ही तुमच्यासारखा नाही. सभेला यायचे, भाषण करायची, मग घरी जाऊन झोपायचे या सवयी मला नाहीत. मी प्रत्येक निवडणूक माझ्या शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढत आलो आहे. मला माझ्या शिवसैनिकांसोबत रहायला आवडते. मी शिवसेना काँग्रेसच्या ताब्यात जाण्यापासून वाचवली. त्यामुळे माझ्यावर कुणाचा कंट्रोल आहे असे जर कुणी म्हणत असेल त्यांचा खोटा प्रचार माझे शिवसैनिक हाणून पाडतीलच,” असे शिंदे म्हणाले.
महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. जागा पदरात पाडून घेताना तुम्हाला झुंजावे लागले का या प्रश्नावर असा कोणताही संघर्ष नव्हता असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. “कोणी कोणत्या जागा लढवायच्या याची महायुतीमधील घटक पक्षांना पुर्ण कल्पना होती. त्यामुळे संघर्ष वगैरे काहीही नव्हता. निवडणूक लढविताना काही गणिते जुळवावी लागतात. त्यामुळेच १४ जागा पदरात पाडून घेण्यात मी यशस्वी ठरलो, मुख्यमंत्र्यांचा मुसद्दीपणाचा विजय वगैरे बातम्या तुम्ही चालविल्यात. आमचे व्यवस्थित सगळे ठरले होते. जागा वाटपातील जय, पराजय हे तुमच्या मनाचे मांडे आहेत. आमचे लक्ष्य लोकसभा निवडणुकीतील एकत्रित, संघटीत विजयाचे होते हे ध्यानात घ्या,” असे शिंदे म्हणाले.