अन्नधान्याच्या महागाईने सर्वसामान्यांना पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरापासून डाळींचे भाव भडकल्याने जनता हैराण झाली होती; मात्र बटाटे, कांदे आणि इतर भाज्यांचे दरही वाढत आहेत. सरकारचेच आकडे याला पुष्टी देत आहेत.
एप्रिल महिन्याच्या किरकोळ महागाई दरानुसार, अन्नधान्य महागाई दर मार्चमधील ८.५२ टक्कयांवरून ८.७० टक्कयांवर पोहोचला आहे. या काळात पालेभाज्या आणि भाज्यांच्या महागाईच्या दरात मोठी वाढ झाली आहे तर डाळींच्या महागाईतही वाढ झाली आहे. घाऊक महागाई दराच्या आकडेवारीनुसार घाऊक बाजारात बटाटे, कांद्यासह भाज्यांची भाववाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डाळींच्या घाऊक विक्रीमध्येही वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार विभागाच्या म्हणण्यानुसार, खाद्यपदार्थांच्या किमतींवर नजर टाकल्यास १३ मे २०२४ रोजी बटाटे किरकोळ बाजारात २८.८४ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होते. एक वर्षापूर्वी ही किंमत १९.६४ रुपये प्रति किलो होती. एका वर्षात बटाट्याच्या दरात ४६.८४ टक्कयांनी वाढ झाली आहे. कांद्याचा सध्याचा भाव ३१.७१ रुपये प्रति किलो आहे, जो एक वर्षापूर्वी २१.४९ रुपये प्रति किलो होता. एका वर्षात कांदा ४७.५५ टक्कयांनी महागला. टोमॅटो सध्या ३२.४३ रुपये किलो दराने उपलब्ध आहे, जो एक वर्षापूर्वी २२.९५ रुपये किलो दराने उपलब्ध होता. एका वर्षात किमती ४१.२० टक्कयांनी वाढल्या आहेत.
बटाटा आणि कांद्याच्या किमती वाढल्याने महागाई वाढली आहे. तूर आणि उडीद डाळीच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात तांदळाचे दरही वाढले आहेत. १३ मे २०२४ रोजी तांदूळ ४४.४१ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होता. तो एका वर्षापूर्वी ३८.५७ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होता. एका वर्षात तांदळाच्या किमती १५.१३ टक्कयांनी वाढल्या. गव्हाची सध्याची किंमत ३०.५२ रुपये प्रति किलो आहे. ती एक वर्षापूर्वी २८.७३ रुपये प्रति किलो होती. एका वर्षात गव्हाच्या किमती ६.२३ टक्कयांनी वाढल्या आहेत. किरकोळ बाजारात सध्या तूरडाळ १५४.०५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. वर्षापूर्वी ११८.५२ रुपये प्रति किलो दराने ती उपलब्ध होती. एका वर्षात तूरडाळीच्या दरात सुमारे ३० टक्कयांनी वाढ झाली आहे. उडीद डाळ १२४.८७ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. गेल्या वर्षी १०८.६४ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होती. एका वर्षात उडीद डाळीच्या किमतीत १४.९३ टक्कयांनी वाढ झाली आहे.
एक वर्षापूर्वी साखर ४२.२६ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होती. ती आता ५.१५ टक्कयांच्या वाढीसह ४४.६५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. ‘केअरएज रेटिंग’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा यांनीही खाद्यपदार्थांमध्ये उच्च महागाई दिसून येत असल्याचे सांगितले. भाजीपाला आणि डाळींच्या किमतीत वाढलेली महागाई चिंतेचे कारण आहे, असे सांगून सिन्हा म्हणाल्या, असमान मॉन्सून आणि त्याचे वितरण महागाईला तोंड देण्यासाठी भाग पाडेल. अन्नधान्याच्या चलनवाढीव्यतिरिक्त जागतिक वस्तूंच्या किमतीत होणारी वाढदेखील महागाईसाठी मोठा धोका आहे.
