महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका आटोपत असताना, प्रचार संपायच्या आधल्या सायंकाळी, मुंबईत दोन भव्य सभा पार पडल्या. एक होती शिवाजी पार्कच्या भव्य मैदानावरील महायुतीची तर दुसरी होती बीकेसीमधील मैदानावरील महावाकस आघाडीची. राज्यात या आघाडी व युतीची ही नावे असली तरी राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी अशी नावे आहेत.
दोन्ही सभांसाठी मुंबईकरांनी लाखा लाखांची गर्दी केलेलीच होती आणि दोन्हीकडे दणदणित भाषणेही पार पडली. शिवाजी पार्कवरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी असे दोन पक्ष राज्यात काँग्रेस सोबत गेले असून ते देशाचे वाटोळे कऱण्यासाठी सत्ता मागत आहेत. तुम्हाला विकास हवा तर कमळ आणि धनुष्यबणाला मत द्या. मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. जेंव्हा शिवाजी पार्कवर मोदींचे भाषण सुरु होते तेंव्हा म्हणजे, साडे सात पावणे आठच्या सुमारास उद्धव ठाकरे हे बीकेसी मैदानावर जाऊन पोचले.
बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी 1966 मध्ये स्थापन केली तेंव्हा शिवसेना हे वादळी, आक्रमक आणि पेटून उठलेल्या भूमिपुत्रांचे संघटन होते. ते स्वरूप आता पाच सहा दशकांनंतर नक्कीच बदलले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आधी राजकीय आखाड्यात आपण उतरणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यांचे संघटन सुरुवातीला समाजिक संघटन होते पण आपला विचार रुजवण्यासाटी आणि मागण्या पदरात पडून घेण्यासाठी आपले स्वतःचे लोकप्रतिनिधी विधानसभेत असले पाहिजेत व म्हणूनच राजकारणात उतरल्या शिवाय पर्याय नाही, हे लक्षात येताच ठाकरेंनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण अशी लवचिक भूमिका घेतली.
पुढे तीन दशकांनंतर त्या भूमिकेत भरपूर परिवर्न ठाकेरंनीच वेळोवेळी केले. पूर्णवेळ राजकारण करणाऱ्या पक्षात शिवेसनेचे रूपांतर झाले. बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवातीला प्रजा समाजवादी आणि डाव्या विचारांकडे झुकलेल्या नेत्यांसह आघाडीचे राजकारण केले. पुढे 80च्या दशकात, शिवाजी पार्कच्या एका सभेत कामगार नेते दत्ता सामंत, तत्कालीन विरोधी पक्षाचे शिलेदार शरदराव पवार आणि बाळासाहेब हे हातात हात घालून परिवर्नाची भाषा करत आहेत, असेही दृष्य मुंबईने पाहिले.
नंतर त्यांना भाजपा प्रणित हिंदुत्वाचा विचार सापडला आणि गर्वसे कहो हम हिंदु है अशी गर्जना करीत महाराष्ट्र पादाक्रांत करयाला बाळासाहेब ठाकरे भाजपासह सरसावले. त्या वेळी जाहीर भाषणांतूनही शिवसेनेचाच या युतीत वरचष्मा असेल व आहे, हे ठाकरे ठासून सांगत. मतभेद झाले तेंव्हा भाजपाचा व्यंगात्मक उल्लेख, कमळाबाई, असाही थोरल्या ठाकरेंनी केला. त्यांचे बोलणे हसून सोडून देण्याची कला राज्यातील भाजपाचे प्रमुख प्रमोद महाजन यांना चांगली साधली होती.
पण त्याच प्रमोद महाजनांनी भाजपाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना बजावलेले होते की भाजपाचे ध्येय्य महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवणे हेच आहे. 2004 मध्ये महाजनांनी हे संगितले होते पुढच्या दशकभरात महाराष्ट्रातील भाजपाची पावले ही सेनेपासून दुरावत गेली. पण तरी निवडणुकीत हिंदुत्वाची युती चांगली कामगिरी करत असल्याने राजकीय युती कायमच राहिली, तरी जागांची भांडणे वाढत गेली. दहा वर्षांनंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकां वेळी शिवसेनेचा 151 जागांचा हट्ट भजापाने अमान्य केला. तोवर देशाचे पंतप्रधानपद भाजपाला स्वबळावर घेता आले होते. त्यांची खासदारांची लोकसभेतील संख्या मे 2014 च्या निकालाने 282 वर नेली होती आणि भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची खासदारांची संख्या तीनशे पार झाली होती. सहाजिकच एन निवडणूकीच्या तोंडावर भाजपाने शिवसेनेशी युती तोडली. भाजपासोबत २००९ ला युतीत ४६ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने २०१४ च्या निवडणूकीत भाजपाशिवाय ६३ जागा जिंकल्या. आणि राज्यात स्वबळाचे नारे जोरात वाहू लागले. 2019 च्या निवडणुकीत मात्र भाजपाने पुन्हा स्वताहून शिवसेनेपुढे युतीचा हात पुढे केला. ठाकरेंने तो मान्य केला आणि लोकसभेत भाजपाचे 303 खासदार बसले आणि रालोआची लोकसभेतील संख्या 350 वर गेली, त्यात शिवसेनेचे 18 खासदारही सहभागी होते. या साऱ्या भजापाच्या चढत्या क्रमात शिवेसनेची अस्वस्थता मात्र वाढत होती. त्यांना भाजपा सोबतची युती एकाच वेळी नकोशीही वाटत होती आणि सोडवतही नव्हती. शिवसैनिकांमध्ये राजकीय भूमिकेवरून दोन तट पडले होते आणि ती दरी पुढच्या काळता विस्तारत गेली.
2014 पासून उद्धव ठाकरे हे सातत्याने सरकारमध्ये सहभागी असूनही भाजपा विरोधात भूमिका घेत होते. मुंबई मनपाच्या 2017 च्या निवडणुकीत हे प्रकर्षाने जनतेपर्यंत पोचले. भाजपा बरोबरच्या युतीमुळे शिवेसनेची पंचवीस वर्षे सडली, असे झोंबरे उद्गार सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी काढले.
सहाजिकच 2019 च्या विधानसभा निकालानंतर जे राजाकारण महाराष्ट्रात घडले ते अगदीच धक्कादायक वगैरे नव्हते. त्याच्या पाऊल खुणा 2014 नतंर सतत दिसतच होत्या. पण भाजपा बरोबर युतीमध्ये लोकसभा व विधानसभेसाठी मतदान घेतल्या नंतर सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेस समवेत स्थापन करणे हा उद्धव ठाकरेंचा निर्णय अनेक शिवसेना आमदारांना व कार्यकर्त्यांना अमान्य होता असे दिसले. त्याच वेळी राष्ट्रवादीतही मोठी अस्वस्थता होती. संस्थापक अध्यक्ष शरद पवारांनी सेना भाजपात वाढत असलेल्या दुराव्याचा चा राजकीय फायदा करून घेण्याचे डाव रचले. पण ते पूर्णत्वास नेले नाहीत. २०१९ च्या निकाला नंतर राष्ट्रवादीच्याच पत्रामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली गेली होती. तेंव्हा पवार एकाच वेळी ठाकरें बरोबर व दुसीरकडे भाजपा बरोबर सत्ता सहभागाच्या वाटाघाटी करत होते. राष्ट्रवादी व भाजपात साऱ्या वाटाघाटी संपल्या नंतर ऐन शपथविधी ठरवण्याच्या वेळी पवारांनी माघार घेतल्याने अजितदादांचा गट संतप्त झाला आणि त्यांनी भाजपा समवेत पहाटेचा तो ऐतिहासिक शपथविधी उरकून घेतला. ते सरकार तांत्रिक कारणा वरून जेमतेम तीन दिवसच टिकले. पण नंतर अलिकडे जे मोठे उत्पातकारी राजकारण घडले, त्याची बीजे त्या पहाटेच्या शपथविधीत नक्कीच रुजली होती. आधी शिवसेना फुटली कालांतराने राष्ट्रवादीतही तेच घडले.
एकनाथ शिंदेंनी ठाकरे व शरदरावांच्या महाविकास आघाडी सरकारमधून तब्बल 40 आमदारांसह अंग कढून घेतले आणि आघाडी सरकारचाच अंत झाला. पण त्याच वेळी सेनेतील महाभारताचीही सुरुवात झाली. अजुनही ते महाभारताचे युद्ध संपलेले नाही. शिवसेना फुटीने एक मोठा धडा राजकीय पक्षांना घालून दाखवला. पक्षांतर बंदी कायद्याला वाकुल्या दाखवून एखादा राजकीय पक्ष निघून जाऊ शकतो हे शिंदेंनी दाखवून दिले व तोच धडा अजित पावर प्रफुल्ल पटेलांनी पुढे गिरवला. दिल्लीतील महाशक्तीमुळे देशातील सर्वोत्तम घटना तसेच कायदे तज्ज्ञांचा सल्ला शिंदेंसाठी अजितदादंसाठी उपलब्ध होता. आपण पक्ष सोडला नाही, पक्ष फोडलाही नाही, उलट खरी शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना म्हणजे आम्हीच आहोत अशी जी भूमिका घेऊन एकनाथ शिंदे व त्यांचे आमदार-खासदार उभे राहिले, त्यातूनच त्यांच्या विरोधातील पक्षांतर बंदीचे खटले खालच्या कोर्टात निकाली निघाले. सुप्रीम कोर्टात लढा अजून सुरु आहे. पक्षावरील आणि पक्ष चिन्हावरील शिंदेंचा दावा निवडणूक आयोगानेही सत्य ठरवला. त्याला कारण एकच विधीमंडळातील बहुमत. याच मुद्द्यावर मोदींनी त्यांना खरी शिवेसना असे म्हटले आणि सहाजिकच ठाकरेंच्या नेतृत्वात मातोश्रीवर उरलेली शिवसेना ही खरी नाही असा पवित्रा भाजपा नेतृत्वाने घेतला.सध्या सुरु असणाऱ्या लोकसभेच्या महापर्वंची महाराष्ट्रातील सुरुवात चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या जाहीर सभेमधून झाली. त्यात बोलताना मोदींनी काँग्रेस समवेत नकली सेना आहे, नकली रा.काँ. तिकडेच आहे, असे उद्गार काढले. लोकसभेच्या दीड एक महिन्याच्या प्रचारावर या असली नकली चर्चेची व त्यातून ठाकरेंच्या झालेल्या चिडचिडीची छाया होती. मतदार राजा आजच त्याचा फैसला करणार आहे आणि तो निकाल काय आहे हे मात्र 4 जूनलाच कळणार आहे !!