मुंबई : लोकशाहीच्या उत्सवात मतदान केंद्रावर जात नवमतदारांनीही आपले कर्तव्य बजावले. प्रथमच मतदानाचा अधिकार मिळालेल्या नवमतदारांनी मोठ्या उत्साहात सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर जात लोकशाहीच्या प्रति असलेले आपले कर्तव्य बजावले. मुंबई शहरासह उपनगरातही मोठ्या संख्येने नवमतदारांनी मतदान केले. जबाबदार नागरिकाचे कर्तव्य बजावल्याचा अभिमान असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुंबई शहर जिल्हा आणि उपनगर जिल्ह्यात सुमारे एक लाखाहून अधिक नवमतदारांची नोंद झाली होती. त्यामुळे यंदा नवमतदार किती मतदान करणार, त्याचा प्रतिसाद कसा असणार, असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर होता. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. त्याला सामान्य, ज्येष्ठ आणि नवमतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. अनेक जण सुटीनिमित्त गावी गेले होते, मात्र प्रथमच मतदानाचा हक्क बजावायचा असल्याने ते मुंबईत दाखल झाले होते.
सातच्या ठोक्याला केंद्रावर हजर
लोकशाहीच्या माध्यमातून प्रथमच मतदानाचा हक्क मिळाल्याने अनेक तरुणांमध्ये मोठा उत्साह होता. सकाळी सातच्या ठोक्याला मतदान करायचे म्हणूनही ठिकठिकाणच्या मतदान केंद्रांवर तरुण नवमतदारांनी हजेरी लावली होती. अलोक कुमार या तरुणाने कुर्ला पश्चिम येथील गणेशबाग शाळेत सकाळीच सुरुवातीला आपला मतदानाचा हक्क बजावला.
सेल्फी शेअरिंगचा ट्रेंड
नवमतदार मतदान केल्यानंतर बोटावर प्रथमच शाई लागल्याने ते चांगलेच भारावून गेले होते. मतदान केंद्रांबाहेर आल्यानंतर प्रत्येकजण शाई लागलेल्या बोटासह मोबाईलमध्ये सेल्फी क्लिक करत होता. तसेच हा फोटो फेसबुक, एक्स, इन्स्टावर शेअरिंग करण्याचा ट्रेन्ड दिसून आला.
