डोंबिवली, : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडले होते; मात्र अनेक ठिकाणी मतदान यादीत नावच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यातच उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मतदार यादीत नावच नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला, तर काहींचे पहिलेच मतदान असूनही मतदान करता आले नाही.
कल्याण ग्रामीण, डोंबिवली मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव नसल्याने गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. उन्हात लोक मतदानासाठी बाहेर पडले; मात्र नाव सापडत नसल्याने मतदार गोंधळून गेले. राजकीय पक्ष, नगरसेवकांनी मतदारांची नावे शोधण्यासाठी बुथ लावले होते. दुपारी मतदान केंद्राऐवजी राजकीय पक्षाच्या बुथवर मतदारांची झुंबड उडाली होती. नाव सापडत नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी यात लक्ष देत पाच वर्षे सतत काम करायला हवे, तरच हा गोंधळ पुढे होणार नाही, अशी मागणी शिवसेनेचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी केली.
पगार कापला जाण्याची भीती
मतदानासाठी सुट्टी जाहीर केली असली तरी मतदान न केल्यास तीन दिवसांचा पगार कापला जाणार असल्याची नोटीस खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे यादीत नावेच नसल्याने मतदार रडकुंडीला आले होते. आम्हाला कोणीतरी मतदार यादीत नाव नाही, इतके तरी लिहून द्यावे, अशी याचना ते करत होते. आमचा हक्क आहे, आम्हाला मतदान करायचे आहे, अन्यथा आमचा पगार कापला जाईल, पगार कापला गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न नोकरदार करत होते.
आमच्या घरात एकूण नऊ ते दहा मतदार आहेत. यातील दोघांचे नाव मतदार यादीत आहे. बाकी सर्वांची नावे नाहीत. आम्हाला के. सी. गांधी येथे जाऊन १७ नंबरचा फॉर्म भरून घेऊन या, मग मतदान करता येईल, असे सांगितले. तिथे गेल्यावर असा कोणता फॉर्म नाही, तुम्हाला मतदान करता येणार नाही, असे सांगितले. माझे वडील ८५ वर्षांचे आहेत. दरवेळी ते मतदान करतात. आताच त्यांचे नाव कसे कापले. आम्ही मतदान करायचे नाही का?
– राहुल पाटील, डोंबिवली, मतदार
