अकोला : अमरावतीची जागा भाजपच लढणार असून जो उमेदवार असेल तो कमळावर लढणार असल्याचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाच्या आनंद अडसूळ या जागेसाठी आग्रही होते. शिंदे गटाकडे असणाऱ्या या जागेवरुन अडसूळ अडून बसले होते. त्यांचा विरोध डावलून अमरावतीवर आज अखेर भाजपाने दावा केला आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भाजपच्यावतीने जाहीर झालेल्या उमेदवारांच्या मतदारसंघात एकूण निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मी दौरा करीत आहे.
अमरावतीची जागा भाजप लढेल. जो उमेदवार असेल तो पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. नवनीत राणा विद्यमान खासदार आहेत. त्या पूर्ण पाच वर्ष भाजपसोबत राहिल्या आहेत. लोकसभेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपची बाजू मांडली. मात्र, अंतिम निर्णय पक्षाची संसदीय मंडळ व निवडणूक समिती घेईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांचे काही प्रश्न होते. ते प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असून काही सोडवले देखील आहेत. ते भाजपमध्ये आल्यापासून पक्षाप्रति समर्पित भावनेने कार्यरत आहे. पूर्णक्षमतेने ते पक्षाचे काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.