शुभेच्छा
वर्षा विजय देशपांडे
आज-काल समाजात सारखी ओरड ऐकू येत असते की माणुसकी दिसत नाही. मात्र हे विधान खोटे ठरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि संघटक अविनाश पाठक सर!
स्नेहबंध हे नशिबानेच होत असतात. मी आणि माझे यजमान विजय देशपांडे,आम्ही गोंदियाला, तर पाठक कुटुंब नागपूरला. मात्र नागपूरच्या तरुण भारत, आसमंत पुरवणीमध्ये माझी कथा येते काय आणि अविनाश सर ती वाचतात,, त्यांना ती आवडते, मात्र माझा फोन नंबर नसतो. अशावेळी अविनाश सर गोंदिया येथील हितवादचे पत्रकार दिवाकर फाटक यांच्याकडून माझा फोन नंबर मिळवतात, आणि फोनवर मला म्हणतात “आपली कथा मला आवडली. अभिनंदन. मी रामटेकच्या गडावरून या नावाने दिवाळी अंक दरवर्षी काढत असतो. यावर्षी प्रत्येक जिल्ह्यातील एका लेखकाची कथा मी घेणार आहे . गोंदिया जिल्ह्यातर्फे आपली कथा पाठवा.”मी अचंबीत, सर्वच धक्का देणारे, पण गोड!
रामटेकच्या गडावरून. हा दिवाळी अंक दरवर्षी विशेष पुरस्कार मिळवणारा, अगदी स्पेशल. ही घटना २००७ ची,त्यानंतर प्रत्येक वर्षी दिवाळी अंकात माझी कथा असायचीच.
माझ्या कथा वाचून त्यांनी मला शेतकरी आत्महत्या हा विषय घेऊन कथा लिहायला सुचवले आणि मग एका वर्षीच्या दिवाळी अंकात माझी या विषयावरची लघु कादंबरीच प्रसिद्ध झाली. त्यांचे श्रेय अविनाश पाठकांकडेच जाते.लेखनाद्वारे असे स्नेहबंध अचानक जुळून आले.
माझे इतरही लिखाण सुरू होतेच. ते प्रसिद्ध देखील होत होते. या कालखंडात मी “काटेरी मुकुट” नावाची कादंबरी लिहून काढली. या दरम्यान आमचा गोंदिया येथील कार्यकाल संपला. माझे यजमान विजय देशपांडे निवृत्त झाले आणि आम्ही नागपूरला आलो. सहाजिकच अविनाश पाठक यांना भेटण्याची उत्सुकता आम्हाला होती. त्यांच्या घरी आम्ही गेलो. आणि एक शांत, धीर गंभीर ,अत्यंत सोज्वळ आणि त्याचवेळी कार्यमग्न व्यक्तिमत्त्वाचे दर्शन झाले. त्याच वेळी मी माझ्या काटेरी मुकुट ह्या कादंबरीचे हस्तलिखित त्यांना वाचायला दिले. चार दिवसानी फोन केला, तर म्हणाले कादंबरी उत्कृष्ट आहे. मग आम्ही दोघे त्यांच्याकडे गेलो आणि कादंबरी कुणाकडे प्रकाशित करावी याविषयी मी विचारले. सरांचेही लिखाण झाले होते. अविनाश पाठक हे चांगले लेखक आहेत आणि सरांची देखील बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहेत हे त्यावेळी समजले. आजघडीला अविनाश सरांची १४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात काळ्या कोळशाची काळी कहाणी हे कोळसा घोटाळ्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक, मराठी वाङमय व्यवहार..चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक, पूर्णांक सुखाचा ही कादंबरी, याशिवाय डावपेच आणि सत्तेच्या सावलीत हे दोन राजकीय कथा संग्रह, दाहक वास्तव, दृष्टीक्षेप, मागोवा घटितांचा आणि कालवाहाच्या वळणावरून हे वैचारिक लेखांचे संग्रह, तर हितगुज, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश, आठवणीतले नेते, आणि थोडं आंबट थोडं गोड हे पाच ललित लेखांचे संग्रह यांचा समावेश आहे. यातील काही पुस्तके प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित देखील झाली आहेत.
अविनाश पाठकांची बरीच पुस्तके नागपुरच्या लाखे प्रकाशनकडे प्रकाशित झाली होती. त्यामुळे त्यांनी लाखे प्रकाशन हे नाव सुचवले. मी म्हटले, आमची अजिबात ओळख नाही. इथे पुन्हा माणुसकीचा प्रत्यय आला. आम्हा उभयतांच्या सोबत ते लाखेकडे आले आणि लाखे प्रकाशानातर्फे माझी काटेरी मुकुट कादंबरी प्रसिद्ध झाली. यावेळपर्यंत एक कौटुंबिक नाते आमच्यात निर्माण झाले होते. त्यांच्या सुविद्य पत्नी अनुरुपा पाठक आणि मुलगी दिव्येशा यांच्याशीही स्नेहबंध जुळले.
आता वेळ आली प्रकाशन समारंभाची. पुस्तक प्रकाशन सोहळा कसा करायचा? पाठक दांपत्याच्या सल्ल्याने आम्ही उत्कृष्ट असा कार्यक्रम आखला .लक्ष्मीनगरघ्या सांस्कृतीक भवनात देखणा कार्यक्रम साजरा झाला. शुभांगी भडभडे, डॉ प्रज्ञा आपटे आणि स्वतः अविनाश पाठक सर हे तिघे प्रमुख वक्ते होते.
अविनाश पाठक हे पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून तर आम्हाला परिचित होतेच, पण या निमित्ताने ते चांगले संघटक देखील आहेत हे कळले. त्यांचा सर्वच क्षेत्रात असलेला व्यापक जनसंपर्क देखील लक्षात आला.
अर्थात सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील संघटक म्हणून अविनाश सरांची कारकीर्द फारच मोठी आहे. विविध सामाजिक संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत. रोटरी सारख्या संघटनेत त्यांनी अवघ्या तीन महिन्यांत एक नवा क्लब उभा केला. भारत विकास परिषद या सामाजिक संघटनेचे काम त्यांनी नागपुरात रुजवले. अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटनेचे नागपुरात फारसे काम नव्हते. फेब्रुवारी २०२२ मध्ये अविनाश सर या संघटनेचे विदर्भाचे कार्याध्यक्ष झाले आणि वर्षभरात विदर्भातील अकराही जिल्ह्यांत परिषदेच्या शाखा त्यांनी सक्रिय केल्या. याशिवाय अजूनही विविध सामाजिक संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत.
काटेरी मुकुट नंतर लाखे प्रकाशनातर्फे माझा अकल्पित हा कथासंग्रह प्रकाशित झाला. पण येथेच गोष्ट संपली नव्हती. माझा लिखाणाचा कल अचानक नाटकाकडे वळला. मी दुर्गे दुर्घट भारी नावाची एकांकिका लिहिली. पुन्हा आम्ही दोघे पाठक सरांकडे गेलो. याचं काय करायचं? सर म्हणाले नाटकाविषयी मला जास्त माहिती नाही. परंतु आपल्या येथील किशोरआयलवार यांना नाटकाविषयी खूपच आत्मियता आहे. तुम्ही त्यांना जाऊन भेटा. त्यांचा फोन नंबर त्यांनी आम्हाला दिला. शिवाय त्यांना फोन करून आम्ही भेटायला येतो आहे हे कळवले. म्हणजे ते या वेळेला आमचे मार्गदर्शक झाले. त्यांच्यातील माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन झाले. किशोर आयलवार यांना माझी एकांकिका दाखवली. त्यांनी ती वाचल्यावर , आम्हाला फोन करून बोलावून घेतले. त्यांनी आम्हाला ती मुंबईला पाठवायला सांगितली. आणि अखिल भारतीय नाट्य परिषद नागपूर तर्फे या एकांकिकेला लेखन संहितेसाठी द्वितीय पुरस्कार मिळाला.
अविनाश सरांना देखावा करता येत नाही. जसे आहे तसे वागतात आणि ते मुळातच इतके सात्विक स्वभावाचे आहे की कोणालाही त्यांच्याविषयी तक्रार नसतेच, किंवा नसावी. कोणाविषयी त्यांना जेलसी नाही. प्रत्येकाने समोर यावे यासाठी त्यांची धडपड असते. माझे ‘दोन नाटक दोन एकांकिका” हे पुस्तक प्रकाशित केले औरंगाबाद येथील रजत प्रकाशनातर्फे. हे नाव अविनाश सरांनीच सुचवले होते. याला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले. याचे श्रेय सरांनाच देते.
माझे यजमान विजय देशपांडे यांनी भौतिक शास्त्र विषयात बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल अशी वेगळी अभ्यासपद्धती विकसित केली होती. ती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अविनाश पाठक यांनी पुढाकार घेत भारत विकास परिषदेतर्फे शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना सहभागी करून घेत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र त्याच काळात कोविडचे लॉकडाऊन सुरू झाल्याने तो कार्यक्रम बारगळला. मात्र समाजोपयोगी काम लोकांसमोर यावे यासाठी अविनाश सरांची धडपड पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.
आज २१ मे रोजी असे हे माणुसकी जपणारे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले अविनाश पाठक सर वयाची ६९ वर्ष पूर्ण करून सत्तराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. आजही ते अगदी एखाद्या तरुणाला लाजवील इतक्या उत्साहात सर्वच क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचे अजून एक पुस्तक लाखेच प्रकाशित करणार आहेत. साहित्य परिषदेचे काम विदर्भात अगदी तालुका स्तरावर नेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. हे सर्व करताना त्यांचे दैनंदिन लेखन देखील सुरूच असते. शिवाय पत्रकारिता , साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात धडपडत पुढे येऊ बघणा-यांना कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करायला ते सदैव तत्पर असतात.
आजच्या युगात अशी माणुसकी जपता निरपेक्ष भावनेने पुढे येऊन मदत करणारी व्यक्ती आपल्याला भेटते ही केवळ ईश्वरकृपाच म्हणते मी. आजच्या अविनाश पाठक यांच्या ६९ व्या वाढदिवसाच्या दिवशी मी अविनाश पाठक सरांना खूप खूप शुभेच्छा देते. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
(लेखिका विदर्भात साहित्यिक आणि नाट्यलेखिका म्हणून गाजलेल्या आहेत.