मुंबई : “मी जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओळखतो, त्यानुसार जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि जर त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दुसऱ्या कुणावरतरी अवलंबून राहण्याची वेळ आली, तर मला वाटतं ते स्वत:च सत्तेतून बाहेर पडतील”, असं खळबळजनक दावा शरद पवार यांनी केला आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रणोय रॉय यांनी आपल्या ‘डीकोडर’ या यूट्यूब चॅनलवरील ‘काऊंटडाऊन महाराष्ट्र २०२४’ या कार्यक्रमासाठी शरद पवारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी वरील भाकीत वर्तवले.
लोकसभा निवडणुकीच्या देशात पाचव्या टप्प्यासाठी नुकतंच मतदान पार पडलं. या टप्प्यासह महाराष्ट्रातील सर्व टप्प्यांचं मतदान पूर्ण झालं आहे. देशपातळीवर अजून दोन टप्प्यांचं मतदान शिल्लक आहे. १ जून रोजी एग्झिट पोल आणि ४ जून रोजी संध्याकाळी अंतिम निकाल हाती येईल. या निकालांबाबत वेगवेगळी भाकितं वर्तवली जात असली, तरी शरद पवारांनी वर्तविलेले हे भाकित ब्रेक्रींग न्युज ठरले.
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण नसल्याचंही शरद पवारांनी या प्रणव रॉय यांच्याशी बोलताना नमूद केलं. “महाराष्ट्र नेहमीच प्रगती करणाऱ्या अग्रगण्य राज्यांपैकी एक राहिला आहे. जर पुन्हा महाराष्ट्राला तिथे न्यायचं असेल, तर काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. एकतर इथलं गुंतवणुकीसंदर्भातलं सकारात्मक वातावरण पुन्हा निर्माण करावं लागेल. जर कुणाला भारतात गुंतवणूक करायची असेल, तर पूर्वी त्यांची पहिली पसंती महाराष्ट्रासाठी होती. पण आता ते घडताना दिसत नाहीये. हे राज्यातल्या नेतृत्वामुळे घडत आहे. सरकार नियंत्रित करणाऱ्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल असं मला वाटत नाही”, असं शरद पवार म्हणाले.
