मुंबई : पंचवीस वर्षांचे एक जोडपं एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे, श्रीमंतीच्या माजुरडेपणामुळे रस्त्यावर तडफडून मेले आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवत आहेत?. याप्रकरणी पोलिसांवर दबाव आणणारे स्थानिक सुनील टिंगरे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, ते तसेच वागणार. हे माणुसकी शुन्य लोक आहेत. पोलीस ठाण्यात पिझ्झा बर्गर खायला घालताय. खोटा मेडिकल रिपोर्ट देत आहात, त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि अशा लोकांवर पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. असे आयुक्त पुण्याला लाभले असतील तर पुण्याला कलंक आहेत”, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
पुण्यातील लोकांनी पोलीस आयुक्तांसमोर जाऊन आंदोलन केलं पाहिजे. काय चाललंय हे. आमदार रवींद्र धंगेकर यासाठी उभे ठाकलेले आहेत. पुणेकरांनीही आता त्यांच्यासोबत हा लढा लढला पाहिजे असे राऊत म्हणाले. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
“पुणे पोलिसांनी दो आँखे बारा हाथ सिनेमा सुरू केला आहे. हा सर्व पैशांचा खेळ आहे. मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार पोलिस आणि न्यायालयाने केला आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान , दारुच्या नशेत असलेल्या या मुलाला पोलीस ठाण्यात पिझ्झा खायला दिला असा आरोप मदार रवींद्र धंगेकर यांनी केला. व्हिडियोत हा मुलगा दारु पित असल्याचे दिसत असूनही पोलिसांनी सादर केलेल्या रिपोर्टमध्ये तो दारू पीत नसल्याचे कसे काय येऊ शकते असा सवालही धंगेकर यांनी केला.
मी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गेलो होतो- टिंगरे
दरम्यान आमदार सुनील टिंगरे यांनीही आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले आहे. “माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल (१९ मे) पहाटे ३ च्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली. तसंच माझे परिचित विशाल आगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलिस ठाण्यात गेलो. यावेळी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता पोलिस निरक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं. मी त्यांना फोन केला असता १५ मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पीआय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो.” असे टिंगरे यांनी व्टिट केले आहे.
