स्वाती घोसाळकर
मुंबई : अठराव्या लोकसभेतील सर्वाधिक चर्चेला जाणारा मतदार संघ म्हणून एव्हाना बारामती मतदार संघाची ओळख झाली आहे. शरद पवारांची लेक सुप्रीया सुळे आणि अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात होणाऱ्या या लढतीकडे अवघ्या देशाचे लक्ष आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे या जागेचा फैसला राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय देणारा ठऱणार आहे. त्यामुळे एकेक मत निर्णायक ठऱणार असतानाच या बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते विजय शिवतारे ठाम आहेत. त्यांचा या बंडखोरीमुळे अजित पवारांची चांगलिच दमछाक होणार आहे. भर उन्हाळ्यातील या गरमीत हे असे तापलेले राजकीय वातावरण अजित पवारांना घाम फोडणारे असल्याची मिश्किल टिपणी सोशल मीडीयावर व्हायर होतेय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंची समजूत काढण्याचा याआधी प्रयत्न केलेला आहे. युतीधर्म पाळा अशी समजही त्यांना वर्षावर बोलावून देण्यात आली होती. तरही ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे म्हणत त्यांनी थेट विजयाचं गणित सांगितलं आहे.
‘5 लाख 50 हजार मतदार हे पवारांचा विरोध करतात’
पुन्हा एकदा मतदारसंघाच्या दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली आहे. ते 20 मार्च रोजी भोर तालुक्याच्या दौऱ्यावर असून तेथील कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. 6 लाख 86 हजार मतदार पवारांचे समर्थन करतात. तर 5 लाख 50 हजार मतदार हे पवारांचा विरोध करतात. पवार घरण्याचे समर्थन करणारे मतदार हे नणंद आणि भावजई यांना मतदान करतील. पण पवार घराण्याच्या विरोधात असणारे मतदार कोणाला मतदान करतील असा सवाल करीत यासाठीच मी उभा रहातोय असे ते म्हणाले.
पवार कुटुंबाच्या विरोधात असणाऱ्या सर्वांनी आम्हाला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींनाही द्यायचे नाही. मग आम्ही मतदान कोणाला द्यायचे, असा सवाल मला केलाय. म्हणूनच मी बंड केलेलं नाही. मी माझं कर्तव्य केलं आहे. पवार परिवाराला कंटाळेल्या लोकांना योग्य संधी देण्यासाठी मी ही जागा लढवतोय. मी माझं लोकशाहीतील कर्तव्य करतोय,” असेदेखील शिवतारे यांनी स्पष्ट केले.
माझा पाठींबा मोदींनाच…
मुख्यंत्री मला सांगत आहेत की आपण युती धर्म पाळला पाहिजे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे नेते अमित शाह यांना शब्द दिला आहे. एक-एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे युतीचा खासदार निवडून आला पाहिजे, असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे. प्रत्येक जागेवर युतीचा विजय झाला पाहिजे, असंच माझंही मत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करतो. मात्र बारामतीची परिस्थिती वेगळी आहे. बारामतीतून अजित पवार जिंकू शकत नाहीत, हे त्रिवार सत्य आहे. मी निवडूण आलो तर माझा मोदींनाच पाठींबा असेल असेही शिवतारे म्हणालेत.