खोपोलीत ३३ जणांना नोटिसा; कारवाईचा खर्च वसूल करणार
खोपोली;- मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर खोपोली नगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. शहरातील अनधिकृत व असुरक्षित होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याची मोहीम खोपोली पालिकेकडून सुरू करण्यात आली असून होर्डिंगधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
खोपोली शहर व परिसरातील होर्डिंगचे प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत १९, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत दोन, खोपोली एसटी महामंडळ, बस स्थानक १०, रमाधाम वृद्धाश्रम दोन असे एकूण ३३ होर्डिंग अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व होर्डिंगधारकांना खोपोली नगरपरिषदेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.खोपोली शहरात झळकणाऱ्या होर्डिंगचीही पाहणी करण्यात येत आहे, हे होर्डिंग परवानगी घेउन लावले आहे का, त्याचा परवान्याची मुदत संपली आहे का, तसेच होर्डिंग लावताना सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली आहे का, त्याची रचनात्मक तपासणीचा अहवाल २८ मे २०२४ पर्यंत नगरपरिषद कार्यालयात जमा करावी अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. त्यानंतर अनधिकृत होर्डिंग नगरपरिषदेकडून हटवण्यात येणार असून त्याचा खर्च संबंधित होर्डिंग धारकाकडून वसूल करण्यात येईल असा इशारा खोपोली नगर परिषदेकडून देण्यात आला आहे.
