२०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अनेक लोक कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी गुंतवणुकीसाठी धाव घेत आहेत. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हे करबचतीच्या चांगल्या पर्यायांपैकी आहेत.
प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत गुंतवणुकीवर १.५ लाख रुपयांपर्यंतची वजावट आहे. वजावटीची रक्कम एकूण उत्पन्नातून वजा केली जाते. यामुळे कर दायित्वही कमी होते. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स इक्विटी म्युच्युअल फंड आहेत, जे त्यांच्या मालमत्तेपैकी किमान ८० टक्के इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवतात, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही दीर्घकालीन सरकारी लहान बचत योजना आहे. पीपीएफ सर्वात सुरक्षित कर बचत गुंतवणूक पर्याय मानला जातो. याउलट, ईएलएसएस फंडांमध्ये जोखीम असते. कारण हे फंड प्रामुख्याने शेअर बाजारात पैसे गुंतवतात. शेअर बाजारात चढ-उतार होण्याची दाट शक्यता असल्याने यात जोखीम असते.
पीपीएफमधील व्याजदर संपूर्ण कार्यकाळासाठी निश्चित केलेला नाही; परंतु हमी आहे. सध्या ७.१ टक्के व्याज मिळत आहे. ईएलएसएस फंडाचा परतावा चांगला आहे. इक्विटी ओरिएंटेड योजना असल्याने ईएलएसएसमध्ये पीपीएफ किंवा मुदत ठेवीसारख्या निश्चित उत्पन्न योजनांपेक्षा दीर्घ कालावधीत जास्त परतावा देण्याची क्षमता आहे. एएमएफआय या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या संघटनेच्या मते निवडक ईएलएसएस फंडांनी गेल्या पाच वर्षांमध्ये बेंचमार्क निर्देशांकापेक्षा जास्त परतावा दिला आहे. यामध्ये क्वांट ईएलएसएस टॅक्ससेव्हर फंड, एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंड आणि डीएसपी ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड यांचा समावेश आहे, ज्यांचे रिटर्न्स २० ते ३० टक्के आहेत.
ईएलएसएस आणि पीपीएफमधील गुंतवणुकीवर कलम ८० सी अंतर्गत वजावट उपलब्ध आहे. एका आर्थिक वर्षात कलम ८० सी अंतर्गत कमाल वजावट मर्यादा १.५ लाख रुपये आहे. रिटर्नवरील कराच्या बाबतीत पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ईएलएसएसला मागे टाकते. यामध्ये गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीवर परतावा हे तिन्ही घटक करमुक्त आहेत. ईएलएसएसच्या बाबतीत गुंतवणुकीच्या नफ्यावर दीर्घकालीन भांडवली नफा म्हणजेच एलटीसीजी कर भरावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *